पहिल्या टी२० सामन्यात झाले आयसीसीच्या नवीन नियमांचे उल्लंघन !

रांची । येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस नियमाने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव केला. या सामन्यांपासून आयसीसीच्या नवीन नियमाचे पालन करणे संघाना गरजेचे होते, पण पहिल्या सामन्यात असे झाले नाही.

आयसीसीच्या नवीन नियमाप्रमाणे जर कोणताही टी-२० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे १० पेक्षा कमी षटकांचा करण्यात आला तर प्रत्येक गोलंदाजाने किमान २ षटके गोलंदाजी करणे गरजेचे आहे.

पण रांची येथील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेयरेन्दॉफ, अँड्र्यू टाय, अॅडम झाम्पा आणि ख्रिश्चन या गोलंदाजांनी प्रत्येकी १ षटक गोलंदाजी केली तर फक्त नाथन कॉल्टर-नाईल या गोलंदाजाने २ षटके गोलंदाजी केली. पण नवीन नियमानुसार ऑस्ट्रेलियाच्या फक्त ३ गोलंदाजांनी गोलंदाजी करायची होती आणि ते ही प्रत्येकी २ षटके.

याच बरोबर ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन फिंच आणि भारताच्या शिखर धवनने हे मान्य केले आहे की नियमांचा बदल या सामन्यापासून लागू होता हे आम्हांस माहित नव्हते. डीआरएस आता टी२०मध्ये पण वापरला जाणार आहे हे ऑस्ट्रेलियाच्या संघाला तेव्हा कळले जेव्हा नियमित कर्णधार स्टिव्ह स्मिथ ५व्या षटकात खेळाडूंना पाणी देण्यासाठी मैदानात आला, असे फिंचने सांगितले.

“बॅटच्या आकारमानाचा नियम या मालिकेनंतर लागू होणार आहे. मग बाकीचे नियम आता कसे लागू होतील हे मला समजले नाही. म्हणूनचं मी आणि माझे सहकारी गोंधळून गेलो होतो.”