‘जर नेहरा ३६ व्या वर्षी पुनरागमन करू शकतो तर युवी का नाही?’ माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने युवराज सिंग भारतीय संघात पुनरागमन करू शकतो असे म्हटले आहे. आयपीएलच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सेहवाग बोलत होता.

सेहवाग या कार्यक्रमादरम्यान असेही म्हणाला की आगामी आयपीएल लिलाव प्रक्रियेच्या आधी किंग्स इलेव्हन पंजाब संघासाठी युवराज आणि हरभजन सिंग या दोन खेळाडूंची नावे आयपीएलच्या चहात्यांच्या इच्छायादीत आहेत. आयपीएल २०१८ चा लिलाव २७ आणि २८ जानेवारीला होणार आहे.

सध्या युवराज भारतीय संघाच्या बाहेर आहे. याबद्दल सेहवाग म्हणाला, “तो भारतीय संघात सध्या नाही, पण युवराज अजूनही उत्तम खेळाडू आहे. त्याची गुणवत्ता अजूनही पहिल्यासारखी आहे. सध्या भारतीय संघात असलेल्या खेळाडूंचाही फॉर्म जाऊ शकतो. मला नाही वाटत त्याच्यासारखा खेळाडू आपल्याला परत भेटेल. जर तो चांगल्या फॉर्ममध्ये असेल तर तो एकहाती सामना जिंकून देणारा खेळाडू आहे.”

युवराजने काही दिवसांपूर्वीच भारतीय संघात निवड होण्यासाठी आवश्यक असलेली योयो टेस्ट यशस्वी पार केली आहे. त्यामुळे तो संघात पुनरागमन करू शकतो हे सांगताना सेहवागने आशिष नेहराचे उदाहरण दिले आहे.

याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाने म्हटल्याप्रमाणे सेहवाग म्हणाला, “हे सगळे निवड समितीवर अवलंबून आहे. जर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि योयो टेस्टही पास झाला तर तो पुनरागमन का नाही करू शकत? जर आशिष नेहरा ३६ व्या वर्षी पुनरागमन करू शकतो तर युवी का नाही”

आयपीएल आर्थिकदृष्ट्या खेळाडूंना मदत करते हे सांगताना सेहवाग म्हणाला, “आयपीएलने मला आर्थिक मदत केली. कारण जेव्हा मी भारतीय संघासाठी खेळायचो तेव्हा मला प्रत्येक सामन्यासाठी २ लाख रुपये मिळायचे. कसोटी सामन्यासाठी ५ लाख मिळायचे आणि अचानक आयपीएलमध्ये तुम्हाला १० करोड ते १२ करोड कराराप्रमाणे मिळतात. यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होता. तुम्ही तुमच्या फिटनेसवर चांगले काम केले तर तुम्ही भारतासाठी आणि आयपीएलमध्ये चांगले खेळू शकता.”

युवराज, गौतम गंभीर आणि हरभजन यांच्या आयपीएल भविष्याबद्दल सेहवाग म्हणाला, “जेव्हा तुम्हाला भारतीय संघातून वगळले जाते, तेव्हा तुमची किंमत कमी होते. युवराज, गौतम गंभीर आणि हरभजन भारतासाठी सध्या खेळत नाहीत. त्यामुळे त्यांना १० किंवा १२ करोड रुपये मिळणार नाहीत.”