जर फरान आख्तर मिल्खा सिंग यांची भूमिका करू शकतो तर रणवीर सिंग कपिल देव का साकारू शकत नाही

भारताच्या महान कर्णधारांपैकी एक असणारे कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची काही दिवसांपूर्वी नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘१९८३’ असे असणार आहे. 

यावर कपिल देव आज झालेल्या एका संवादात बोलताना म्हणाले “चित्रपट सृष्टीतील सध्याचे अभिनेते चांगले आहेत.” तसेच रणवीर सिंग कपिल देव यांची गोलंदाजी शैली तंतोतंत मोठ्या पड्यावर साकारू शकेल का या प्रश्नावर त्यांनी चिंता व्यक्त न करता थेट फरान अख्तरचे उदाहरण दिले. ते म्हणाले “मला माहित नाही, पण जेव्हा मी भाग मिल्खा भाग चित्रपट पहिला तेव्हा विश्वासच बसत नव्हता की फरान अख्तर मिल्खाजिंपेक्षाही चांगली करू शकतो” पुढे कपिल म्हणाले ” सकारात्मक दृष्टीने विचार केला तर हे अभिनेते खूप चांगले करतायेत”

या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. या चित्रपटात १९८३ च्या विश्वचषकाचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. हा विश्वचषक भारतीय संघाने कपिल यांच्या नेतृत्वाखाली विंडीज संघाविरुद्ध जिंकला होता.

या विश्वचषकात कपिल देव यांची झिम्बाब्वे विरुद्धची नाबाद १७५ धावांची खेळी आणि त्यांनी अंतिम सामन्यात घेतलेला विव रिचर्ड्स यांचा झेल प्रसिद्ध झाला होता.

कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये विक्रमी ४३४ बळी घेतले आहेत.