विजय-कोहली शतकाच्या उंबरठ्यावर, भारत २ बाद २२९

दिल्ली । फिरोजशहा कोटलावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामन्याला आज (दि. २) सुरुवात झाली. भारताचा विजय रथ रोखून मालिकेत बरोबरी साधण्याचा श्रीलंकाचा प्रयत्न असणार आहे, तर विजयरथ कायम ठेऊन मालिका जिंकण्याचा भारताचा निर्धार आहे.

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोटलाच्या खेळपट्टीवर किंचितसे हिरवं गवत असल्याने चौथ्या डावात फलंदाजी करणे कठीण होते म्हणून कर्णधार कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला असावा. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाल्याने भारताची २ बाद ७८ अशी अवस्था झाली होती.

दोन्ही फलंदाजाला खेळपट्टीला टिकून फलंदाजी करता आली नाही. हे दोन्ही खेळाडू चांगले सेट झाले असताना खराब फटके मारून बाद झाले. त्यानंतर नागपूर कसोटीत शतकी कामगिरी करणाऱ्या सलामीवीर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीने संघाला सावरले.

दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतके पूर्ण करून संघाची धावसंख्या ५२ षटकांमध्ये २ बाद २२९वर नेऊन ठेवली. एका बाजूने मुरली विजय संयमी फलंदाजी करत असताना कर्णधार विराट कोहलीची फटकेबाजी क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळाली. ५२ षटकाच्या अखेरीस मुरली विजय ९४ (१५४ चेंडू) आणि विराट कोहली ८५ (९२चेंडू) धावांवर नाबाद होते.