रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव, अव्वल स्थानाचे स्वप्न भंगले !

प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या शेवटच्या दिवशी दुसरा सामना पुणेरी पलटण आणि गुजरात फॉर्च्युनजायंट्स यांच्यातील गुजरातने २३-२२ असा जिंकत अ गटात अव्वल स्थान पटकावले.

या सामन्यात संदीप नरवालने प्रो कबड्डीच्या इतिहासात स्वतःचे नाव लिहले. संदीप नरवालचा हा प्रो कबड्डीमधील ८१ सामना आहे. प्रो कबड्डीत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू म्हणून यापुढे संदीप नरवालला ओळखले जाणार आहे.

नाणेफेक जिंकून पुण्याने गुजरातला प्रथम रेड करण्यास आमंत्रित केले. गुजरातचा कर्णधार सुकेश हेगडेने प्रथम रेडमध्ये गुण मिळवला आणि गुजरातला चांगली सुरुवात मिळवून दिली. दुसऱ्या रेडमध्येही गुजरातच्या सचिनने गुण मिळवला आणि दीपक हुडाला बाद केले. पहिल्या ४ मिनिटात पुण्याच्या एकही रेडरला गुण मिळाला नाही. पाचव्या मिनिटाला कर्णधार दीपकने पुण्यासाठी सामन्यातील पहिला रेड गुण मिळवला. त्यानंतर राजेश मोंडलनेही लयमध्ये येण्याचे संकेत दिले.

गुजरातचा डिफेन्स या सामन्यात लयमध्ये दिसत नव्हता. पहिल्या १० मिनिटात फाझल आतरांजली ३ वेळा बाद झाला. तरी सुद्धा गुजरातच्या रेडरने पहिल्या सत्राच्या १४ मिनिटानंतर गुजरातला एका गुणांची बढत मिळवू दिली होती. दोन्हीही संघ डू और डाय रेडवर खेळत होते त्यामुळे पहिल्या सत्रा अखेर
पुणे ११- ११ गुजरात असा स्कोर होता. पहिल्या सत्रात पुण्याकडून रिंकू नरवालने डिफेन्समध्ये ४ गुण मिळवले तर गुजरातकडून सचिनने रेडमध्ये ५ गुण मिळवले.

पहिल्या सत्राप्रमाणेच दुसऱ्याही सत्रात सचिनने रेड गुण मिळवत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण दुसरीकडे पुण्याचे दोन्ही रेडर दुसऱ्या सत्रात लागोपाठच्या रेडमध्ये बाद झाले. त्यामुळे गुजरातला २ गुणांची बढत मिळाली. त्यानंतर गुजरातच्या डिफेन्सने पुण्याचा रेडर अक्षय जाधवला बाद केले आणि बढत वाढवून ३ गुणांची केली. पण त्यानंतर १३व्य मिनिटाला जि बी मोरेने बोनस अधिक एक गुणांची रेड करून सामना १६-१६ असा बरोबरीत आणला.

आता सामना डू और डाय रेडमध्ये कोणाला यश मिळणार याच्यावर ठरणार होता. पण त्यानंतरही पुण्याचा रेडर राजेश रेडमध्ये बाद झाला. पण पुण्याच्या डिफेन्सने गुण मिळवून सामान पुन्हा १७-१७ असा बरोबरीत आला. त्यानंतर दीपकने रेडमध्ये गुण मिळवून पुण्याला बढत मिळवून दिली व त्यानंतर गिरीश एरण्यकने सुकेश हेगडेला टेकल केले आणि पुण्याची बढत २ गुणांची झाली.

शेवटच्या २ मिनिटाला स्कोर पुणे १९ आणि गुजरात १७ असा होता. शेवटच्या मिनिटाला कर्णधार दीपक बाद झाला आणि सुपर टेकलचे २ गुण गुजरातला मिळाले त्यानंतरच्या रेडमध्ये महेंद्र राजपूतने गुण मिळवून गुजरातला बढत मिळवून दिली. त्यानंतर गुजरातकडे १ गुणांची बढत होती. तेव्हा गुजरातच्या प्रशिक्षकांच्या चुकीमुळे पुण्याला एक टेक्निकल गुण मिळाला. पण सामना बरोबरीत सुटला असता तरी सुद्धां पुण्याचा संघ झोन ए मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचले नसते.

शेवटी हा सामना गुजरात संघाने २३-२२ असा जिंकला.