केपटाउनमध्ये दोन मिनिटांच्यावर टीम इंडियाला शॉवर घेण्यास मनाई

केपटाउन । सध्या या शहरात मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना नागरिक करत आहे. आता टीम इंडियालाही याचा सामना करावा लागणार आहे.

स्थानिक प्रशासनाने भारतीय संघाला सराव तसेच सामन्यानंतर २ मिनिटांच्यावर शॉवर घ्यायला मनाई केली आहे.

येथे पाऊस न झाल्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली असून धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे ७व्या स्तरावरील पाणी वापरण्यासाठीची बंधने नागरिकांना सध्या या शहरात पाळावी लागत आहेत.

दुःष्काळी परिस्थिती असतानाही या शहरात गेल्या महिन्यात कसोटी सामना आयोजित केला होता. याचबरॊबर उद्या येथे मालिकेतील तिसरा वनडे सामना होणार आहे.

पाण्यासारखा गंभीर प्रश्न भेडसावत असताना एक प्रेक्षक म्हणून तुम्ही खेळाकडे लक्षच देऊ शकत नाही आणि सामने पाहायला हजेरी लावू शकत नाही हे येथील कसोटी सामन्याला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या संख्येवरून दिसून आले.

तुम्ही दोन मिनिटांत अंघोळ करून दिवसाला पाणी कसे वाचवू शकता याचे कार्यक्रम या शहरात आयोजित करण्यात येत आहे. एका दिवसात तुम्ही ५० लिटर पाण्यात कसे जगू शकता हे माध्यमांमधून सांगितले जात आहे.

कसोटी सामना येथे ५ जानेवारी ते ९ जानेवारी या काळात झाला तेव्हा दिवसाला पाणी वापरायची मर्यादा प्रत्येक व्यक्तीमागे ८६ लिटर होती ती आता बरोबर एक महिन्याने ५० लिटर करण्यात आली आहे. यावरून येथील दुष्काळाचा अंदाज येतो.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचे खेळाडू स्थानिक प्रशासनाने दिलेले हे आदेश पाळतात की नाही हे जरी सामान्यांना समजणार नसले तरी एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा नक्की ठेवली जात आहे.