- Advertisement -

भारताचा दक्षिण आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर 

0 144

किमबर्ली। दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारत महिला संघात सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिलांनी ३०२ धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताकडून सलामीवीर फलंदाज स्म्रिती मानधनाने आक्रमक शतकी खेळी केली आहे तर हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्थीने अर्धशतक केले आहे.  

दक्षिण आफ्रिकेने आज नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाला चुकीचे ठरवत भारताच्या स्म्रिती मानधनाने आणि पूनम राऊतने चांगली सुरुवात केली होती. मात्र पूनम २० धावांवर असताना तिला मस्बाता क्लासने बाद केले. 

त्यानंतर काही वेळातच कर्णधार मिताली राजही २० धावांवर बाद झाली. तिला सून लूसने बाद केले. यानंतर मात्र स्म्रितीने आणि हरमनप्रीत कौरने डाव सांभाळत भारताला भक्कम स्थितीत आणले. या दोघींनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी रचली. 

स्म्रितीने आज १२९ चेंडूत १३५ धावा केल्या. यात तिने १४ चौकार आणि १ षटकार खेचला आहे. हे तिचे वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. ही तीनही शतके तिने भारताबाहेर केली आहेत. याआधी तिने ऑस्ट्रेलियामध्ये आणि इंग्लंडमध्ये शतक केले होते. आज स्म्रितीला रायसिब टोझखेने बाद केले. तसेच स्म्रितीने पहिल्या वनडे सामन्यातही अर्धशतकी खेळी केली होती. 

आज स्म्रितीला भक्कम साथ देणाऱ्या हरमनप्रीतनेही ६९ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या आहेत. तर अखेरच्या काही षटकात वेदा कृष्णमूर्थीने तडाखेबंद खेळी करताना ३३ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. याजोरावर भारताने ५० षटकात ३ बाद ३०२ धावा केल्या आहेत आणि दक्षिण आफ्रिकेला ५० षटकात ३०३ धावांचे आव्हान दिले आहे.    

Comments
Loading...
%d bloggers like this: