असा झाला फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न

मुंबई । आज फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा उदघाटन सोहळा जोगेश्वरी येथील एसपीआरएफ ग्राउंडवर पार पडला. यावेळी अनेक मान्यवर, प्रो कबड्डी आणि कबड्डी क्षेत्रातील आजी-माजी खेळाडू, मुंबई उपनगरमधील खेळाडू आणि प्रेक्षक उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगा आणि भारतीय संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे यांनी खेळाडूंना शपथ दिली.

मुंबई उपनगरातील दोन ढोल पथकांच्या वादनाने संध्याकाळी या सोहळ्याची सुरुवात झाली. हा संपूर्ण सोहळा १ तासाच्यावर चालला. भारतीय संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल आणि यु मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याचबरोबर अण्णा चेरलाथन, रिशांक देवाडिगा, वजीर सिंग आणि अन्य अनुभवी खेळाडूंच्या मैदानात झालेल्या एन्ट्रीवर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

“मला जेवढे हरियाणामध्ये प्रेम मिळते त्यापेक्षा जास्त प्रेम गेल्या ५ वर्ष मला या शहराने दिले आहे. या शहरात कबड्डी खेळण्यात एक वेगळीच मजा आहे. मुंबई माझे दुसरे घर आहे. ” असे भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अनुप कुमार यावेळी म्हणाला.