आमदार चषक कबड्डीत युनियन बँकेवर आयकरची धाड

मुंबई: सामन्याच्या पहिल्याच चढाईला आयकरच्या अक्षय जाधवचे दोन गुण आणि त्याला चोख उत्तर देताना युनियन बँकेकडून पहिली चढाई करताना नितेश मोनेने बाद केलेले चार खेळाडू पाहून सामना रंगतदार होणार, असा कबड्डीप्रेमींना विश्वास बसला. पण झालं नेमकं उलटं.

आयकरच्या खेळाडूंनी पहिल्याच चढाईत बसलेल्या धक्क्यानंतरही खोलवर चढाया आणि जोरदार पकडी करून युनियन बँकेवर पहिल्या सत्रात धाड टाकून आमदार चषक कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. आयकरने युनियन बँकेचा41-21 असा धुव्वा उडवला.

काल एअर इंडियावर धक्कादायक मात करणाऱया मुंबई बंदराला बलाढ्य नाशिक आर्मीने 43-24 असे लोळवले तर मध्य रेल्वेने आपल्या सलग दुसऱया विजयाची नोंद करताना महिंद्र आणि महिंद्राचा 45-28 असा फडशा पाडला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पुण्याच्या बीईजीने आपले विजयी अभियान सुरू करताना बँक ऑफ इंडियाचा 34-17 असा पराभव केला.

प्रभादेवीच्या मुरारी घाग मार्गावर चवन्नी गल्लीत सुरू झालेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेत दुसऱया दिवशीही कबड्डीप्रेमींना कबड्डीचा वेगवान थरार याची देही अनुभवता आला.

माहिम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकारामुळे प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा क्र. 194 यांनी संयुक्त आयोजित केलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसऱया दिवशीच्या पहिल्या सामन्यात मध्य रेल्वेने आपली गाडी सुसाट असल्याचे दाखवून दिले.

या हंगामात आपल्या अफलातून खेळाने भल्याभल्या संघांचा घामटा काढणाऱया महिंद्र आणि महिंद्रला सलामीच्याच लढतीत हार सहन करावी लागली. काल जबरदस्त चढायांचा खेळ करणाऱया श्रीकांत जाधवने आजही आपला तोच फॉर्म कायम ठेवला. त्याने एका चढाईत खोलवर खेळ करत महिंद्राच्या तीन खेळाडूंना खेचत आणले.

या तीन गुणांच्या कमाईनंतर महिंद्रावर पहिला लोण चढला. महिंद्रच्या शेखर तटकरे आणि अजिंक्य पवारने चढाया-पकडींचा खेळ करीत मध्य रेल्वेवर वारंवार आक्रमण केले. पण रेल्वेच्या गुरविंदर आणि विनोद अत्याळकर यांनी दमदार चढाया करीत मध्यंतराला 22-16 अशी आघाडी घेतली होती, पण मध्यंतरानंतर श्रीकांत,गुरविंदर आणि विनोद अत्याळकर यांनी तिहेरी आक्रमण करीत महिंद्रवर जोरदार हल्ले चढवले आणि सलग दोन लोण चढवत 45-28 अशा फरकाने विजय नोंदवला.

पुण्याच्या आयकर आणि युनियन बँकेत झालेला सामना पहिल्याचा वेगवान चढाईनंतर अनपेक्षितपणे एकतर्फी झाला. अक्षय जाधवचे पहिल्याच चढाईत दोन आणि युनियन बँकेच्या नितेश मोनेही पहिल्याच चढाईत टिपलेले चार खेळाडू हे पाहिल्यावर सामन्याविषयी उत्सुकता वाढली होती.

मात्र त्यानंतर झालेल्या सामन्यात आयकराच्या अक्षय जाधव आणि तुषार पाटीलने कर वसूल करावा असे गुण वसूल केले. पहिल्याच डावात दोन लोण चढवत 28-12 अशी निर्णायक आघाडी घेतली. युनियन बँकेने तेव्हाच हार पत्करली होती. अखेर हा सामना 41-21 असा संपला.

स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या बीईजीपुढे बँक ऑफ इंडियाचा निभावच लागला नाही. मध्यंतराला 15-10 असा गुणफलक होता, मात्र मध्यंतरानंतर बीईजीने दोन लोण वसूल करीत बँक ऑफ इंडियाची 34-17 अशी धुळधाण उडवली. तसेच अन्य एका सामन्यात मुंबई बंदरला नाशिक आर्मीकडून मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

काल एअर इंडियाला धक्का देणारा मुंबई बंदरचा संघ आज खूपच दुबळा भासला. मोनू गोयतचा तुफानी खेळ आणि जयदीप-दर्शनची लाभलेली साथ याच्या जोरावर आर्मीसमोर मुंबई बंदरने 43-24 असे गुडघे टेकले. आज बंदरचा एकही चढाईबहाद्दर समाधानकारक खेळ करू शकला नाही.