टीम इंडियाचा अजिंक्य रहाणे एक चांगला कर्णधार होऊ शकतो

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सन यांच्यातील शाब्दिक युद्ध संपण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. जॉन्सनने पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे विराटवर टीका करताना अजिंक्य रहाणे चांगला कर्णधार होऊ शकतो, असे म्हटले आहे.

त्याने याआधीही मागीलवर्षी अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा धरमशाला येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत रहाणेने भारताचे प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते. त्यामुळे तेव्हाही जॉन्सनने रहाणे भारताचा कर्णधार हवा असे म्हटले होते.

याबद्दल एका चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना पुन्हा एकदा जॉन्सनने शनिवारी(22 डिसेंबर) म्हटले आहे की, ‘रहाणे चांगला कर्णधार होऊ शकतो. त्याच्याकडे चांगला स्वभाव आहे, तो निर्भय आणि स्पर्धात्मक आहे. तसेच त्याच्याकडे चांगली आक्रमकता असून त्याचे हावभावही चांगले असतात. तो युवा खेळाडूंसाठी चांगले उदाहरण आहे.’

तसेच याआधी विराट आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांच्यात पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यानच्या शाब्दिक चकमकी नंतर जॉन्सनने कोहलीवर टीका करताना त्याला ‘अपमानास्पद’ आणि ‘मुर्ख’ असे म्हटले होते.

त्याने फॉक्स स्पोर्ट्सवर लिहिलेल्या एका स्तंभात म्हटले होते की, ‘सामन्याच्या शेवटी तूम्ही एकमेकांशी नजर मिळवून हस्तांदोलन करायला हवे आणि चांगला सामना झाला असे म्हणायला हवे.’

‘विराट कोहलीने टिम पेनबरोबर तसे केले नाही. त्याने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराशी हस्तांदोलन केले पण त्याने पेनशी नजर मिळवली नाही. माझ्यासाठी ही आपमानास्पद वागणूक आहे.’

महत्त्वाच्या बातम्या:

मिशेल जाॅन्सन प्रकरणात टाईम्स ऑफ इंडिया क्रीडा पत्रकाराच्या मागे ठाम उभे

खेळाडू संघसहकाऱ्याच नावच विसरला, म्हणाला त्याला देवाने लवकर बरं करो

ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, तीन खेळाडूंना वगळले