वनडेत १० हजार धावा करण्याबरोबरच ३ खास विक्रम आज धोनीला करण्याची संधी

नॉटींगहम | गुरवारपासून (१२ जुलै) भारत-इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत आहे.

भारत-इंग्लंड मालिकेतील पहिला सामना नॉटींगहम येथील ट्रेंट ब्रीज क्रिकेट मैदानावर होणार आहे.

या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला तीन खास विक्रम करण्याची संधी आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा

धोनी आजपर्यंत ३१८  एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने ९९६७ धाव केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्यास धोनीला आता फक्त ३३ धावांची गरज आहे.

आजच्या सामन्यात धोनीने ३३ धावा केल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारा भारताकडून चौथा तर जगातील बारावा फलंदाज बनू शकतो.

आजपर्यंत भारताकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या तिन दिग्गज माजी कर्णधारांनी दहा हजार धावा करण्याची किमया केली आहे.

इंग्लंड विरुद्ध हा खास विक्रम करण्याची धोनीला संधी

आजच्या सामन्यात एमएस धोनीला भारताकडून इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करत युवराज सिंगचा विक्रम मोडण्याची संधी असेल.

भारताकडून इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराजने  इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक १५२३ धावा केल्या आहेत.

तर दुसऱ्या स्थानी ंमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने इंग्लंड विरुद्ध १४५५ धावा केल्या आहेत.

एमएस धोनीला युवराज आणि सचिनला मागे टाकत या यादित अव्वल स्थानी पोहचण्यासाठी आता फक्त ९८ धावांची गरज आहे. जर आजच्या सामन्यात  ९८ धावा करण्यात धोनी यशस्वी ठरला तर तो भारताकडून इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो.

यष्टीमागे ३०० झेल घेणारा चौथा यष्टीरक्षक

एमएस धोनीने ३१८ एकदिवसीय सामन्यात यष्टीमागे ४०४ बळी टिपले आहेत. यामध्ये २९७ झेल आणि १०७ स्टंपींगचा समावेश आहे. धोनीला या सामन्यात यष्टीमागे ३०० झेल घेण्यासाठी फक्त तीन झेलांची गरज आहे. जर आजच्या सामन्यात धोनी तीन झेल घेण्यात यशस्वी झाला तर तो अॅडम गिलख्रिस्ट, मार्क बाउचर आणि कुमार संगाकारा यांच्या पंक्तित जाऊन बसेल.

अॅडम गिलख्रिस्ट, मार्क बाउचर आणि कुमार संगाकारा यांनी यष्टीमागे अनुक्रमे ४१७, ४०२ आणि ३८३ झेल घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-लोकेश राहुल बाबतचा हा महत्वपूर्ण निर्णय विराटच्या हातात-रोहित शर्मा

-एमएस धोनी म्हणतो, 300 एकदिवसीय सामने खेळलोय; मी वेडा आहे का?