पंड्या, धोनीच्या अर्धशतकांच्या जोरावर भारत ७ बाद २८१

चेन्नई । येथील चेपॉकच्या मैदानावर सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने निर्धारित ५० षटकात ७ विकेट्स गमावत २८१ धावा केल्या आहेत. पांड्याने दणदणीत अर्धशतक करत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ६६ चेंडूत ८३ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीने ८८ चेंडूत ७९ धावा केल्या. धोनीने आपली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००वी अर्धशतकी खेळी केली.

सलामीवीर फलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर भारताचा डाव हार्दिक पंड्या आणि धोनीने सांभाळला. या दोघांनी ६ व्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. पंड्या बाद झाल्यानंतर धोनीने भुवनेश्वर कुमारला साथीला घेत अर्धशतकी भागीदारी केली.

त्याआधी भारताला पहिला झटका संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या रूपाने लागला. त्यानंतर लगेचच कर्णधार विराट कोहलीही बाद झाला. विराटला तर भोपळाही फोडता आला नाही. मनीष पांडे ही शून्य धावा करून तंबूत परतला. केदार जाधव आणि रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होते. पण स्टोयनिक्सच्या गोलंदाजीवर शर्मा बाद झाला. त्यानंतर केदार जाधव व माजी कर्णधार धोनीने संघाला सांभाळले व संघाची धावसंख्या २८०च्या पुढे नेली.

ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कॉल्टर-नाइल आणि स्टोयनिक्सने सुरेख गोलंदाजी केली. नॅथन कॉल्टर-नाइलने ३ विकेट्स घेतल्या तर स्टोयनिक्स २ विकेट्स घेतल्या. भारताच्या गोलंदाजीची भिस्त यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह आणि चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव यांच्यावर असेल. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २८२ गरज आहे.