हा पाकिस्तानी गोलंदाज म्हणतोय विराटविना देखील भारत तितक्याच ताकदीचा

15 सप्टेंबर 2018 पासून संयुक्त अरब अमिराती येथे सुरु होणाऱ्या एशिया कप स्पर्धेत भारतीय कर्णधार विराट कोहली खेळणार नसल्याने भारतीय संघाची कामगिरी कशी होणार याची बरीच चर्चा घडून आली. कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व रोहीत शर्माकडे देण्यात आले आहे.

भारताचा पहिला सामना हाँगकाँग विरुद्ध 18 सप्टेंबरला होणार असून त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रंगतदार सामन्याची अपेक्षा चाहत्यांना आहे.

सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग यांचा एका गटात तर बांग्लादेश, श्रीलंका, आणि अफगानिस्तान यांचा दुसऱ्या गटात समावेश आहे. दोन्ही गटातून प्रत्येकी दोन संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. सर्वोत्तम चार संघांचे सामने 21 ते 26 सप्टेंबर दरम्यान होतील. अंतिम सामना 28 सप्टेंबर २०१८ ला होईल.

भारताने आतापर्यंत 6 वेळा एशिया कप जिंकला असून 7 व्यांदा जिंकण्यासाठी भारत विराट कोहली शिवाय मैदानात उतरणार आहे. अश्या वेळी अनेक बाजूने त्यावर चर्चा होणे सहाजिक आहे. आता या चर्चेत भाग घेतला आहे पाकीस्तानचा वेगवान गोलंदाज फहीम अश्रफ याने.

इंग्लड दौऱ्यात 59.3 च्या सरासरीने 593 धावा करणारा रनमशीन विराट कोहली भारतीय संघात नसल्याने पाकीस्तानच्या रणनीतीत कुठलाही बदल होणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. पाकिस्तान विरूद्धच्या 12 सामन्यात विराटने 45.90 च्या सरासरीने 459 धावा केल्या आहेत. त्यामधे 2012 मधील अशिया कप मधील 183 धावांचा देखील समावेश आहे.

अश्रफ पुढे बोलताना म्हणाला की भारतीय संघ अव्वल दर्जाचा असून विराट कोहली खेळणार नसला तरी भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक आम्ही कधीच करणार नाही.

आम्ही गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात 100 टक्के योगदान देऊ आणि सामने जिंकण्याचा प्रयत्न करू.

आमचा पहीला सामना हाँगकाँग विरुद्ध होणार असून तो झाल्यानंतर आम्ही भारताविरूद्धच्या सामन्याचा विचार करू असे 24 वर्षीय अश्रफने सांगितले. अश्रफचा भारताविरुद्ध हा पहीलाच सामना असणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

संपुर्ण यादी- असे आहेत एशिया कप २०१८ स्पर्धेतील सर्व संघांचे खेळाडू

भारताचे जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे आव्हान संपुष्टात

केएल राहुलच्या बाबतीत झाला नकोसा असा योगायोग