भारतीय संघ दुसऱ्या वनडे सामन्यासाठी कोलकात्यात दाखल

कोलकाता । भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यात २६ धावांनी विजय मिळवल्यावर भारतीय संघ आज संध्याकाळी कोलकाता येथे दाखल झाला. कोलकाता येथे रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयच्या ट्विटर अकाउंटवरून संघाचे चेन्नई विमानतळावरील खास फोटो शेअर करण्यात आले होते.

दुसरा वनडे सामना हा कोलकात्यातील इडन गार्डन मैदानावर २१ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. बंगाल क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष असणाऱ्या सौरव गांगुलीने दुसऱ्या वनडेसाठी कोलकाता सज्ज असल्याचं यापूर्वीच घोषित केलं आहे. चेन्नई प्रमाणेच येथेही हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी भारतीय संघाने सफेद रंगाचे टी- शर्ट्स घातले होती. यावेळी सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षक रवी शास्त्री बरोबर खेळाडूंनी हॉटेलवर जाऊन विश्रांती घेणं पसंत केलं. भारतीय संघ आज कोणताही सराव करणार नसल्याचं यावेळी विमानतळावरच संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. भारतीय संघ बरोबर ३ वाजून ३० मिनिटांनी चार्टर विमानाने कोलकाता येथे पोहचला.

भारतीय संघाप्रमाणे ऑस्ट्रेलिया संघ देखील आज संध्याकाळी कोलकाता येथे दाखल झाला आहे. कोलकाता सामन्यात बाजी पलटवण्याचा विश्वास ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने व्यक्त केला आहे.