१९९० नंतर टीम इंडियाच्या बाबतीत केवळ चौथ्यांदाच घडले असे काही…

पर्थ। आजपासून(14 डिसेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना पर्थमधील आॅप्टस स्टेडीयमवर सुरु आहे.

या सामन्यात अंतिम 11 जणांच्या भारतीय संघात जसप्रीत बुमराह, उमेश यादव, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच हनुमा विहारीला रोहित शर्माच्या ऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्याला पूर्णवेळ फलंदाज म्हणून आणि संघाला गरज असेल तेव्हा गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात संधी मिळाली आहे. या सामन्यात 11 जणांच्या भारतीय संघात पूर्णवेळ फिरकी गोलंदाजाला स्थान देण्यात आले नाही.

असे कसोटीमध्ये 1990 नंतर भारतीय संघाच्या बाबतीत चौथ्यांदाच घडले आहे. याआधी 1992 मध्ये सिडनी कसोटीत भारताने आॅस्ट्रेलिया विरुद्धच पहिल्यांदा चार वेगवान गोलंदाज खेळवले होते.

यामध्ये जवागल श्रीनाथ, सुब्रोतो बॅनर्जी, कपिल देव आणि मनोज प्रभाकर या वेगवान गोलंदाजांचा आणि रवी शास्त्री यांचा कामचलावू गोलंदाज आणि पूर्णवेळ सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता.

तसेच त्यानंतर 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्येच झालेल्या कसोटी सामन्यात असे झाले होते. त्यावेळी भारतीय संघात इशांत शर्मा, झहीर खान, उमेश यादव आणि विनय कुमार या चार वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली होती तर पाचवा गोलंदाज म्हणून विरेंद्र सेहवागने गोलंदाजी केली होती. या सामन्यात भारताला एक डाव आणि 37 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.

यानंतर याचवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारीमध्ये जोहान्सबर्ग कसोटीत भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या या वेगवान गोलंदाजांना भारताच्या 11 जणांच्या संघात स्थान मिळाले होते. या 11 जणांच्या संघात एकाही फिरकी गोलंदाजाला संधी मिळाली नव्हती. हा सामना भारताने 63 धावांनी जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीचे टेन्शन वाढले, चांगली कामगिरी केली नाही तर…

धोनी, गांगुलीप्रमाणे किंग कोहलीच्या नावावरही झाला नकोसा विक्रम

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: पर्थ कसोटीला आॅस्ट्रेलियाची शानदार सुरुवात

पर्थ कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया