टीम इंडियाचे असे झाले गुवाहाटी शहरात स्वागत

गुवाहाटी । भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या टी२० सामन्यासाठी आज गुवाहाटी शहरात दाखल झाला. यावेळी आसाम राज्यातील या शहरात भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले.

७ वर्षांनंतर या शहरात आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. दोन्ही संघातील खेळाडूंचे काल जेव्हा विमानतळावर आगमन झाले तेव्हा मोठ्या प्रमाणावर चाहते उपस्थित होते. विमानतळावर चाहते इंडिया इंडिया अशा जोरदार घोषणा देत होते.

खेळाडूंना विमानतळावरच पारंपरिक टोप्या देण्यात आल्या. याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर खेळाडूंच्या हॉटेलमध्ये त्यांना ओवाळण्यात आले आणि पारंपरिक शाल भेट देण्यात आली.

क्रिकेटमधून संन्यास घेऊन सध्या समालोचकाची जबाबदारी पार पडणाऱ्या ब्रेट लीला सुद्धा चाहत्यांनी गराडा घातला होता.

बार्सपारा स्टेडियम हे नव्याने गुवाहाटी शहरात बांधलेले मैदान असून याची क्षमता ३७,०००एवढी आहे.ह्या मैदानाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे.

येथे होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्याची तिकीटे आधीच विकली गेली आहेत. तिकीटांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहेत परंतु आधीच संपल्यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज आहेत.

येथील नेहरू स्टेडियमवर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २८ नोव्हेंबर २०१० साली झाला होता जेव्हा भारतीय संघाने न्यूजीलँड संघाला ४० धावांनी पराभूत केले होते.