भारतीय महिला संघ आशिया चॅम्पियन

भारतीय महिला हॉकी संघाने आज आशिया कप हॉकी स्पर्धा जिंकली आहे. त्यांनी अंतिम सामन्यात शूट आऊट मध्ये ५-४ ने चीनचा पराभव केला. भारतीय संघाने या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघाने २०१८ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी आपले स्थान पक्के केले आहे.

या सामन्यात दोन्हीही संघाने आपापले अनुभव पणाला लावले होते. सामन्याचा संपूर्ण वेळ संपल्यानंतरसुद्धा १-१ अशी बरोबरी झाली असल्याने सामना शूट आऊटमध्ये गेला. यात भारतीय संघाने ५-४ असे गोल करत सामना जिकून आशिया कपवर १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. याआधी २००४ला भारतीय संघ आशिया कपमध्ये विजयी झाला होता.

आजच्या सामन्यात भारतीय संघाकडून नवज्योत कौरने २५ व्या मिनिटाला गोल करून सामन्यात १-० अशी आघाडी मिळवली होती परंतु चीनच्या तियानतियान लुओने ४७ व्या मिनिटाला गोल करून सामना बरोबरीत केला.

यानंतर सामना शूट आऊटमध्ये गेल्यावरही सामना ४-४ असा बरोबरीचा चालला होता अखेर शेवटची संधी असताना राणीने भारताकडून ५ वा गोल केला आणि ही संधी चीनने दवडली त्यामुळे भारताचा ५-४ असा विजय झाला.

याआधी भारतीय संघाने उपांत्य सामन्यात जपानवर ४-२ असा विजय मिळवला होता.