तिसरी कसोटी: कोहली- विजयच्या दीडशतकांच्या जोरावर भारत ४ बाद ३७१ !

दिल्ली । फिरोजशहा कोटलावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामन्याला आज (दि. २) सुरुवात झाली. भारताचा विजय रथ रोखून मालिकेत बरोबरी साधण्याचा श्रीलंकाचा प्रयत्न भारताने पूर्णपणे हाणून पाडला. दिवस अखेर भारतीय संघ ४ बाद ३७१ अशा मजबूत स्थितीत आहे.

तत्पूर्वी आज भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोटलाच्या खेळपट्टीवर किंचितसे हिरवं गवत असल्याने चौथ्या डावात फलंदाजी करणे कठीण होते म्हणून कर्णधार कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला असावा. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाल्याने भारताची २ बाद ७८ अशी अवस्था झाली होती.

दोन्ही फलंदाजाला खेळपट्टीला टिकून फलंदाजी करता आली नाही. हे दोन्ही खेळाडू चांगले सेट झाले असताना खराब फटके मारून बाद झाले. त्यानंतर नागपूर कसोटीत शतकी कामगिरी करणाऱ्या सलामीवीर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीने संघाला सावरले.

दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतके पूर्ण करून संघाची धावसंख्या ५२ षटकांमध्ये २ बाद २२९वर नेऊन ठेवली. एका बाजूने मुरली विजय संयमी फलंदाजी करत असताना कर्णधार विराट कोहलीची फटकेबाजी क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळाली.

विराटने आज १८६ चेंडूचा सामना करताना नाबाद १५६ धावा केल्या. त्यात १६ चौकारांचा समावेश आहे तर मुरली विजय दिवसातील केवळ ४ षटके बाकी असताना बाद झाला. त्याने २६७ चेंडूत १५५ धावा केल्या. त्यात त्याने १३ चौकार मारले.

विजय बाद झाल्यावर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेला याही कसोटीत काही खास करता आले नाही आणि श्रीलंकेच्या कमकुवत गोलंदाजीसमोर तो केवळ १ धाव करून बाद झाला. दिवस अखेर कोहली आणि रोहित शर्माने जास्त पडझड होऊ न देता १५ चेंडू खेळून काढले.

संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव: ४ बाद ३७१
विराट कोहली खेळत आहे १५६, रोहित शर्मा खेळत आहे ६
मुरली विजय १५५, शिखर धवन २३, चेतेश्वर पुजारा २३, अजिंक्य रहाणे १