क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत उद्या पृथ्वी शॉची टीम इंडिया भिडणार पाकिस्तानला

१९ वर्षांखालील विश्वचषकात उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघ अपराजित राहिला आहे. तर पाकिस्तानने एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे.

या स्पर्धेत आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी प्रत्येक सामन्यात वर्चस्व गाजवले आहे. साखळी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० धावांनी तर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वे विरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवले आहेत. त्यानंतर भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात १३१ धावांनी विजय मिळवत दिमाखात उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने ४ सामन्यांपैकी २ सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. त्यातील एका सामन्यात त्याने फलंदाजी केली नव्हती. त्याच्याबरोबरच शुभम गिल हा फलंदाजही चांगलीच धुवाधार फलंदाजी करत आहे. त्याने फलंदाजी केलेल्या प्रत्येक सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत.

पाकिस्तानने साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारला होता. मात्र त्यांनी त्यानंतर पुनरागमन करत पुढील आयर्लंड आणि श्रीलंका विरुद्धचे सामने जिंकले आहेत. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेला ३ विकेट्सने नमवून उपांत्य सामन्यात प्रवेश केला.

हे दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने क्रिकेट चाहत्यांना चांगला सामना बघायला मिळणार आहे.