वेगवान गोलंदाज आशिष नेहराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विजयी निरोप !

दिल्ली। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज पार पडलेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारतीय संघाने ५३ धावांनी विजय मिळवून भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विजयी निरोप दिला.

या सामन्यात भारताने न्यूझीलंडला एकही संधी न देता सामन्यावर सुरवातीपासूनच वर्चस्व ठेवले होते. भारताने न्यूझीलंड संघाला दिलेल्या २०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलचा झेल हार्दिक पंड्याने सुरेख टिपला. या नंतर लगेच दुसरा सलामीवीर कोलिन मुनरोला भुवनेश्वर कुमारने त्रिफळाचित केले.

त्यानंतर मात्र न्यूझीलंड कर्णधार केन विलिअमसन आणि टॉम लेथमने न्यूझीलंडचा डाव सांभाळायचा प्रयत्न केला परंतु विलिअमसन २८ धावा करून बाद झाला.

परंतु एका बाजूने लेथमने आपला खेळ सुरु ठेवला होता पण दुसरीकडे न्यूझीलंड फलंदाज नियमित कालांतराने बाद होत राहिले अखेर लेथम ३९ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र एकही न्यूझीलंड फलंदाजाला काही खास करता आले नाही अखेर त्यांचा खेळ २० षटकात ८ बाद १४९ धावांवर सीमित राहिला.

भारताकडून गोलंदाजीत युझवेन्द्र चहल आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ बळी तर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी १ बळी घेतले.

तत्पूर्वी भारताकडून आक्रमक फलंदाजी बघायला मिळाली. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आक्रमक खेळताना १५८ धावांची शतकी भागीदारी रचली.त्याचबरोबर दोघांनीही आपापले अर्धशतक पूर्ण केले. तसेच शिखर धवन(८० धावा ५२ चेंडू) आणि रहित शर्माने (८० धावा ५५ चेंडू) प्रत्येकी ८० धावा काढून बाद झाले.

आज अष्टपैलू हार्दिक पांड्याला शिखर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती पण त्याला ती संधी साधता आली नाही.तो शून्यावर बाद झाला. परंतु अखेरच्या काही षटकात कर्णधार विराट कोहलीने(२६* धावा) आक्रमक खेळ करताना ३ षटकार मारले. त्यात एम एस धोनीने(७* धावा) त्याचा खेळ सुरु करताना पहिल्या चेंडूवरच षटकार ठोकत भारताला २०० चा एकदा पार करून दिला.

न्यूझीलंडकडून गोलंदाजीत यश सोधीने २ तर ट्रेंट बोल्टने १ बळी घेतला. भारतीय संघाने ३ बाद २०२ धावा केल्या.

रोहितला प्लेअर ऑफ द मॅच तर शिखर धवनला सामना वीर घोषित केले. तसेच भारतीय संघ पहिल्यांदाच न्यूझीलंड विरुद्ध टी २० सामना जिंकला आहे. त्याचबरोबर ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

सामना संपल्यानंतर आशिष नेहराने संघासोबत पूर्ण मैदानाची चक्कर मारली. आणि आपल्या चाहत्यांना अभिवादन केले. त्याला थोड्यावेळासाठी दिल्लीकर शिखर आणि विराटने खांद्यावर उचलून मैदानात फिरवले. या नंतर संघाने नेहराबरोबर फोटो काढत त्याच्याबरोबर त्याच्या शेवटचा सामना साजरा केला. तत्पूर्वी सामना सुरु होण्याआधी विराट आणि धोनीने मिळून नेहराला एक ट्रॉफी देऊन सन्मानित केले होते.

आशिष नेहराने १८ वर्षांच्या कारकिर्दीत १६४ सामने खेळताना २३५ बळी घेतले आहेत. त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण २४ फेब्रुवारी १९९९ साली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

आशिष नेहराने सामन्यानंतर आपली मते मांडताना सांगितले की “मला नक्कीच या सगळ्याची आठवण येईल पण हेच असत ज्यासाठी तुम्ही तयार होत असता. आता माझ्या शरीराला थोडा आराम मिळेल. ही निवृत्तीची योग्य वेळ होती.” तसेच तो म्हणाला की ” भारतीय संघाचे भविष्य पुढचे ६-७ वर्ष तरी सुरक्षित हातात आहे.”

बीसीसीआयने आशिष नेहराच्या निवृत्तीबद्दल “धन्यवाद आशिष नेहरा” असे ट्विट केले आहे. तसेच विराटनेही ट्विट करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि नेहरासोबत खेळणे हा सन्मान होता असे ,म्हटले आहे.