दक्षिण आफ्रिकेत इतिहास घडवण्याची कोहली सेनेला उद्या मोठी संधी

0 227

आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात तिसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेत सलग तिसरा सामना जिंकून विक्रम करण्याची संधी आहे.

भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकून ६ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या दोन्ही सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे.

दक्षिण आफ्रिकेत सलग दोन सामने जिंकण्याची ही भारताची तिसरी वेळ आहे. याआधी १९९२-९३ मध्ये आणि २०१०-११ मध्ये भारताने सलग दोन सामने जिंकले होते. मात्र त्यानंतर पराभव स्वीकारले होते. त्यामुळे आता हा इतिहास पुसण्याची भारताकडे संधी आहे.

तसेच भारताने या दोन विजयानंतर आयसीसी वनडे क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून अव्वल स्थान मिळवले आहे. हे स्थानही भक्कम करण्यासाठी भारताचा प्रयत्न असेल. भारताचा कर्णधार विराट कोहलीही चांगला फॉर्ममध्ये आहे. फक्त रोहित शर्मा फॉर्मशी झगडत आहे. तसेच युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव हे दोन फिरकीपटूंनी भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली आहे.

याबरोबरच यष्टीरक्षक एम एस धोनीला वनडेत ४०० बळी घेण्याचा विक्रम करण्याचीही संधी आहे. आत्तापर्यंत त्याने यष्टिचित आणि झेल मिळून ३९९ बळी घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मात्र दुखापतींनी घेरले आहे. त्यांचे एबी डिव्हिलियर्स, कर्णधार फाफ डूप्लेसिस आणि क्विंटॉन डिकॉक हे प्रमुख फलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला समस्या उद्भवत आहेत. डुप्लेसिसच्या ऐवजी २३ वर्षीय एडिन मार्करमला प्रभारी कर्णधार करण्यात आले आहे.

यातून निवडला जाणार संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन,अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल, श्रेयश अय्यर, दिनेश कार्तिक,मनीष पांडे, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर.

Comments
Loading...
%d bloggers like this: