काय आहे भारत-श्रीलंका टी२० सामन्यातील नाणेफेकीचा वाद ?

कोलंबो । काल भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात संवादाच्या अभावामुळे श्रीलंका संघ नाणेफेक जिंकूनही भारताला क्षेत्ररक्षण घेण्याची संधी मिळाली. कालच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला ७ विकेट्सने पराभूत केले.

नक्की काय आहे वाद?

या सामन्याचे जर आपण फुटेज पहिल्यापासून पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की विसंवादामुळे काल श्रीलंका संघ नाणेफेक जिंकूनही भारताला याचा फायदा झाला. समालोचक मुरली कार्तिकने नाणेफेकीवेळी दोनही कर्णधारांची ओळख ही सामनाधिकारी अँडी पयक्रॉफ्ट यांना करून दिली. टॉससाठी निवड झालेल्या गौतम नावाच्या चाहताही तेव्हा उपस्थित होता.

श्रीलंकेचा कर्णधार उपुल तरंगाने नाणेफेक केली तर विराटने हेड किंवा टेल्स यापैकी ‘हेड’ असे सांगितले. सामनाधिकारी अँडी पयक्रॉफ्ट यांनी जमिनीवर पडलेल्या नाण्याकडे पाहून टेल्स, कोहली असे म्हटले. त्यावेळी कार्तिक याला त्यांनी कोहली नाणेफेक जिंकला आहे असे वाटले. कार्तिक त्यावेळी म्हणाला, ” नाणेफेक ही भारताच्या बाजूने लागली आहे आणि मी विराट कोहलीला संभाषणासाठी आमंत्रित करत आहे. ”

ज्यावेळी कॅमेरा कोहली आणि कार्तिककडे गेला तेव्हा सामनाधिकारी अँडी पयक्रॉफ्ट यांच्या चेहऱ्यावर काहीतरी गडबड झालेले स्पष्ट जाणवत होते.

त्यांनतर कोहलीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन श्रीलंका संघाला ७ बाद १७० वर रोखले. त्यानंतर कोहलीच्याच ८२ धावांच्या जोरावर भारताने ७ विकेट्सने विजय मिळवत टी२० मालिका जिंकली.