जे ९ भारतीय खेळाडूंना जमले नाही ते विराट-शिखर जोडीने करून दाखवले

पोर्ट एलिझाबेथ । भारताने पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. तसेच तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेत विजय मिळवला.

या विजयात कर्णधार विराट कोहलीचे फलंदाजीमधील यश हे नजरेत भरणारे आहे. त्याने ५ सामन्यात १४३च्या सरासरीने तब्बल ४२९ धावा केल्या आहेत. त्याला तेवढीच चांगली साथ शिखर धवनने दिली आहे. त्यानेही ५ सामन्यात ७६.२५च्या सरासरीने ३०५ धावा केल्या आहेत. 

या संपूर्ण मालिकेत या दोघांनी मिळून ७३४ धावा केल्या आहेत तर बाकी ९ खेळाडूंनी मिळून ५२१ धावा केल्या आहेत. केवळ अजिंक्य रहाणे (१०६ ) आणि रोहित शर्मा (१५५) या दोनच फलंदाजांना १००चा टप्पा पार करता आला आहे. त्यातही रोहितने ५व्या सामन्यात ११५ धावांची खेळी केली नाहीतर त्याच्याही खात्यावर केवळ ४० धावा जमा होत्या. 

एमएस धोनीने ४ सामन्यात ६९, श्रेयस अय्यरने २ सामन्यात ४८, भुवनेश्वर कुमारने ३ सामन्यात ४० तर हार्दिक पंड्याने ४ सामन्यात २६ धावा केल्या आहेत. 

गोलंदाजीत मात्र चहल-यादव जोडीने विराट-शिखर प्रमाणेच कामगिरी केली आहे. ४३ पैकी तब्बल ३० विकेट्स या जोडीने घेतल्या आहेत. यावरून ही संपूर्ण मालिका विराट-शिखर आणि कुलदीप यादव- युझवेन्द्र चहल जोडीचीच असल्यासारखे वाटते.