भारताच्या नावावर असा एक रेकॉर्ड जो कुणीही मोडू शकत नाही

काल पाकिस्तानने १८० धावांनी विजय मिळवून प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद जिंकल. कुणाच्या ध्यानीमनी नसताना अतिशय जबदस्त कामगिरी करत हा संघ अंतिम फेरीत पोहचला आणि विजेतेपदाच्या सर्वात प्रबळ दावेदार भारतावर एकतर्फी विजय मिळवला.

या विजयाबरोबर पाकिस्तानने एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला तो म्हणजे आयसीसीने आयोजित केलेल्या सर्व स्पर्धा एकदातरी जिंकण्याचा. यापूर्वी हा विक्रम होता वेस्ट इंडिज, भारत आणि श्रीलंकेच्या नावावर.

वेस्ट इंडिजने ६० षटकांचा विश्वचषक दोनदा(१९७५, १९७९), टी२० विश्वचषक दोनदा (२०१२,२०१६)आणि चॅम्पियन्स ट्रॉफी एकदा (२००४) जिंकण्याचा पराक्रम केला आहे तर श्रीलंकेने ५० षटकांचा विश्वचषक एकदा(१९९६), टी२० विश्वचषक एकदा (२०१४)आणि चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद भारताबरोबर विभागून (२००२) साली असा पराक्रम केला आहे. पाकिस्तानने ५० षटकांचा विश्वचषक एकदा (१९९२), टी२० विश्वचषक एकदा (२००९) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी एकदा (२०१७) साली जिंकली आहे.

परंतु भारताच्या नावावर असा पराक्रम आहे जो वेस्ट इंडिज सोडून कोणताही संघ मोडू शकणार नाही. भारताने ६० षटकांचा विश्वचषक एकदा (१९८३), ५० षटकांचा विश्वचषक एकदा (२०११), टी टी२० विश्वचषक एकदा (२००७) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी एकदा विजेतेपद (२०१४) आणि एकदा विजेतेपद श्रीलंकेबरोबर विभागून (२००२) अशी कामगिरी केली आहे.

५० षटकांचा आणि ६० षटकांचा विश्वचषक जिंकणारा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे भारताच्या या विक्रमाशी बरोबरी फक्त वेस्ट इंडिज संघ करू शकतो. कारण या संघाने यापूर्वी ६० षटकांचा विश्वचषक जिंकला आहे. परंतु ही बरोबरी करण्यासाठी त्यांना ५० षटकांचा विश्वचषक जिंकणे अनिवार्य आहे.