HWL 2017: उपांत्य फेरीत भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव

भुवनेश्वर: हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये काल भारताचा उपांत्य फेरी सामना अर्जेंटिना विरुद्ध होता. या सामन्यात अर्जेंटिनाने भारताला १-० असे हरवले.

सामना सुरु होण्याअगोदर पावसामुळे मैदान पूर्ण ओले झाले होते. त्यामुळे सामना पुढे ढकलण्याची शक्यता होती. परंतु नंतर मैदान ठीक झाल्यामुळे सामना वेळेत सुरु झाला.

या सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना भारतावर १-० अश्या फरकाने विजय मिळवून अंतिम सामन्यात पोहोचला आहे. गेल्या वर्षीही भारताचा उपांत्य फेरी सामन्यात पराभव झाला होता. याचाच बदला म्हणून भारताने अर्जेंटिना संघाला जोरदार टक्कर दिली होती. परंतु या सामन्यात भारताला विजय मिळविता आला नाही.

या सामन्यातील १७ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. तेव्हा अर्जेंटिनाच्या गोन्झालो पेलेटने भारताच्या गोलकिपरच्या डाव्या बाजूला दोरदार फटका मारला. हा फटका भारताचा खेळाडू आकाश चिकटे याने अडविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला तो अडवता आला नाही व १७ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने पहिला गोल केला.

सातत्याने झालेल्या पावसामुळे मैदान पूर्ण ओले झाले होते. त्याच कारणामुळे पासेस आणि एकंदर खेळ अवघड दिसून येत होता. मात्र अर्जेंटिना सारख्या बलाढ्य संघाने संधीचे सोने केले व पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोल मध्ये करून १-० अशी बधत मिळवली. सुरेख पासेस आणि उत्तम बचावाच्या जोरावर हा सामना अर्जेंटिनाने आपल्या नावे केला.  

दुसऱ्या हाफमध्ये भारताने चांगली आक्रमक सुरुवात केली होती. या हाफमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. परंतु रुपिंदर सिंग ही पेनल्टी गोलमध्ये रुपांतरीत करण्यास अपयशी ठरला. भारताला ऐकामागून ऐक पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु अर्जेंटिनाचा गोलकिपर विवाल्डी हे गोल अडविण्यात यशस्वी झाला.