युथ ऑलिंपिक गेम्समध्ये भारतीय संघाची रौप्य कामगिरी

ब्युनोस आयरसमध्ये (अर्जेंटिना) सुरू असलेल्या तिसऱ्या युथ ऑलिंपिक गेम्समध्ये भारतीय महिला आणि पुरूष हॉकी संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. दोन्ही संघांनी पहिल्यांदाच या स्पर्धेत पदक पटकावले आहे.

यावेळी अंतिम सामन्यात पुरूषांच्या संघाला मलेशियाकडून 2-4 असा तर महिलांच्या संघाला यजमान अर्जेंटीनाकडून 1-3 असा पराभवाचा सामना करावा लागला.

भारताचे या स्पर्धेतील हे 9वे आणि 10वे पदक ठरले असून एकूण 10 पदक मिळवत भारत गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. यामध्ये तीन सुवर्ण आणि सात रौप्य पदकांचा समावेश आहे. तसेच रशिया 43 पदकांसह अव्वल स्थानावर आहे.

तसेच मलेशियाच्या पुरूष आणि अर्जेंटीनाच्या महिला संघाचे हे पहिलेच युथ ऑलिंपिक सुवर्ण पदक आहे. तर अर्जेंटीनाच्या पुरूष आणि चीनच्या महिला संघाला कांस्य पदक मिळाले.

यावेळी पुरूषांच्या सामन्यात कर्णधार विवेक सागर प्रसादने 3ऱ्या आणि 6व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली होती. पण नंतर मलेशियाच्या अखिमुल्लाह अनुरने 14व्या, 19व्या आणि अरिफ इशकने 17व्या मिनिटाला गोल करत सामन्यात आपली पकड मजबूत केली. याआधी फिरदोस रोसदीने 5व्या मिनिटाला गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला होता. दुसऱ्या सत्रात मलेशियाचेच वर्चस्व होते.

यावेळी भारताच्या मुमताज खानने सामन्याच्या 49व्या सेंकदाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र नंतरच्या वेळात अर्जेंटीनाच्या संघाने भारताला चांगलेच त्रस्त केले होते. त्यांच्या जिनेल्ला पॅलेत (7व्या), सोफिया रॅमल्लो (9व्या) आणि ब्रीसा ब्रुग्गेजर (12व्या) यांनी तीन गोल करत संघाला ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून दिले.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियात संधी तर मिळाली, त्याच दिवशी सामना जिंकल्यामुळे त्या दोन खेळाडूंना परतावे लागले पुन्हा घरी

ISL 2018: दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या या संघांचा सुरू आहे संघर्ष

पृथ्वी शॉ, रिषभ पंतची कसोटी क्रमवारीत मोठी झेप…