अमिरीती विरुद्ध भारताला दक्ष राहण्याची गरज

अबुधाबी।  एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत भारताची आज ( 10 जानेवारी) संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध लढत होणार आहे. या सामन्याला रात्री 9.30 वाजता सुरूवात होणार आहे. भारताने थायलंडला हरविले असले तरी अमिरातीविरुद्ध दक्ष त्यांना राहावे लागेल.

स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने थायलंडला 4-1 असे हरविले. सलामीचा हा सामना जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. अमिरातीविरुद्ध अशाच विजयाची पुनरावृत्ती करण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे.

झाये स्पोर्टस सिटीतील लढतीत भारताला कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. प्रशिक्षक कॉन्स्टंटाईन प्रामुख्याने थायलंडविरुद्धच्या दुसऱ्या सत्रातील कामगिरीविषयी आनंदात असतील. थायलंडचे भेदक आक्रमण परतावून लावताना भारताने 1-1 अशा मध्यंतराच्या बरोबरीनंतर पारडे फिरविले. त्यासाठी भारताने आक्रमणात वेगवान स्थित्यंतर साधले. या तुफान कामगिरीमुळे भारताला तीन गुणांची कमाई झाली. आता भारत गटात आघाडीवर आहे. भारताचा गोलफरक अधिक तीन इतका आहे.

कॉन्स्टंटाईन यांनी सांगितले की, येथे आलेला आमचा संघ फार तरुण आहे. खेळाडू फार उत्साहित झाले आहे. अमिराती हा अर्थातच वेगळा प्रतिस्पर्धी असेल. त्यांचा संघ फार चांगला आहे. आमच्या मार्गातील हा आणखी एक प्रतिस्पर्धी आहे.

थायलंडविरुद्ध भारताने आक्रणात आपल्या संधी साधल्या. त्यात आघाडी फळीने सफाईदार कामगिरी केली. सुनील छेत्रीने दोन गोल केले. याशिवाय जेजे लालपेखलुआ आणि अनिरुध थापा यांनी प्रत्येकी एका गोलची भर घातली.

भारतासाठी गोल केले नसले तरी एक खेळाडू लक्षवेधी ठरला आणि तो म्हणजे आशिक कुरुनीयन. चेंडू मिळताच छेत्री आणि एफसी पुणे सिटीचा हा विंगर गोलचे लक्ष्य ठेवायचे. त्यातही कुरूनीयन याची अथक घोडदौड बहुमोल ठरली. त्याचे तंत्र प्रतिस्पर्धी बचाव फळीला निरुत्तर करणारे ठरले. थायलंडच्या तुलनेत सरस प्रतिस्पर्धी असलेल्या अमिरातीविरुद्ध अशाच कामगिरीची पुनरावृत्ती आवश्यक आहे.

फिफा क्रमवारीत अमिराती 79व्या क्रमांकावर आहे. या गटातील संघांमध्ये त्यांचा क्रमांक सर्वोत्तम आहे. भारतासमोर ते अवघड आव्हान निर्माण करीतल. मध्य क्षेत्रात हुकुमत राखण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. त्यामुळे अनिरुध थापा आणि प्रोणय हलदर या भारतीय मध्यरक्षकांना कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागेल.

बचाव फळीलाही दक्ष राहावे लागेल. अली मबखौत आणि 2015चा सर्वोत्तम आशियाई खेळाजू अहमद खलील असे मोहरे अमिरातीकडे आहेत. हे दोघे गोल करण्यासाठी प्रत्नशील असतात. मबखौत याला अमिरातीतर्फे सर्वाधिक गोलांचा उच्चांक करण्यासाठी सात गोलांची गरज आहे. अशावेळी संदेश झिंगन आणि अनास एडाथोडीका यांना धावाधाव करावी लागेल.

अमिरातीचा ओमर अब्दुलरहमान जायबंदी झाला आहे. त्याची उणीव अमिरातीला जाणवेल. तो आशियातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणला जातो. अल्बर्टो झॅक्केरोनी यांच्या संघाकडे भारताचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याची कसोटी पाहण्याइतकी भेदकता आहे.

अमिरातीला पहिल्या सामन्यात बहारीनने बरोबरीत रोखले होते. घरच्या प्रेक्षकांसमोर ते या निकालाची भरपाई करण्यासाठी प्रयत्नशील असतील. झॅक्केरोनी यांनी सांगितले की, आमच्या खेळाडूंना लढाऊ बाणा दाखविता आला नाही. पुढील सामन्यासाठी तयारी करताना आम्ही या त्रुटींवर मात करण्यावर लक्ष दिले. भारताविरुद्ध आमचा दृष्टिकोन आणि पर्यायाने खेळ वेगळा होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

देशातील १ हजार खेळाडूंना दरवर्षी ५ लाख रुपये देणार – केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड

खेलो इंडिया युथ गेम्स: ज्युदोत महाराष्ट्राच्या आदित्य धोपावकरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा

जेव्हा ३४३ धावांचे लक्ष दिलेला संघ होतो ३५ धावांवर सर्वबाद