दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कोलमडली; भारतासमोर ११९ धावांचे आव्हान

सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कोलमडली. त्यामुळे त्यांनी भारताला फक्त ११९ धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक ५ बळी घेतले.

आज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयाला अचूक ठरवत गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला ३२.२ षटकात ११८ धावांवर सर्वबाद केले.

दक्षिण आफ्रिकेने सुरुवात चांगली केली होती. मात्र चांगल्या सुरवातीनंतरही सलामीवीर हाशिम अमला(२३) आणि क्विंटॉन डिकॉक(२०) लवकर बाद झाले. अमलाला भुवनेश्वरने तर डिकॉकला चहलने बाद केले. त्यांनतर लगेचच कर्णधार एडिन मार्करमही(८) कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच षटकात कुलदीपणे डेव्हिड मिलरला शून्य धावेवर बाद केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ४ बाद ५१ धावा अशी झाली.

मात्र जेपी ड्युमिनी आणि आज पदार्पण करणारा खाया झोन्डो यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही यात यश आले नाही. या दोघांनीही प्रत्येकी २५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील याच वयक्तिक सर्वाधिक धावसंख्या ठरली. ड्युमिनी आणि झोन्डो या दोघांनाही चहलनेच बाद केले. त्यानंतर आलेल्या एकही फलंदाजाला खास काही करता आले नाही.

भारताकडून चहल (५), कुलदीप यादव(३), भुवनेश्वर कुमार(१) आणि जसप्रीत बुमराह(१) यांनी बळी घेतले.