भारतापुढे २३१ धावांचे लक्ष !

पुणे। येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळण्यात येत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून या सामन्यात प्रथम फलंदाजी निवडली होती.  ५० षटका अखेर त्यांना ९ बाद २३० धावा करता आल्या.

पहिल्या सामन्याप्रमाणेच प्रथम न्यूझीलंडचे दोन्ही आक्रमक सलामीवीर फलंदाज गुप्टिल आणि मुनरो अयशस्वी ठरले. त्याच बरोबर त्यांचा कर्णधार केन विल्यम्सन ही खेळपट्टी वर जास्त काळ टिकला नाही. त्यानंतर मागील सामन्यातील विजयी जोडी रॉस टेलर आणि टॉम लेथम मैदानात उतरले. या दोघांनी न्यूझीलंडचा डाव सांभाळायचा प्रयत्न केला पण २१ धावा करून रॉस टेलर बाद झाला.

त्यानंतर लेथमने हेन्री निकोल्सच्या मदतीने न्यूझीलंडचा स्कोर पुढे नेला. पण ३० व्या षटकात लेथम अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट मारण्याच्या नादात त्रिफळाचित झाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी नियमित कालांतराने न्यूझीलंडला धक्के दिले आणि न्यूझीलंडला ९ बाद २३० धावात रोखले.

न्यूझीलंडकडून हेन्री निकोल्सने सर्वाधिक म्हणजेच ४२ धावा केल्या. कॉलिन दे ग्रान्डामने ही त्याला चांगली साथ देऊन ४१ धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वोत्तम गोलंदाजी करत २७ धावत ३ विकेट्स घेतल्या. तर युवा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहने ही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारताला हा सामना जिंकण्यासाठी २३१ धावांची गरज आहे जर भारत असे करू शकला तर भारत मालिकेतील आपले आव्हान कायम राखेल. तसेच हा भारताचा न्यूझीलंड विरुद्धचा ५०वा विजय असेल.