दुसरी टी २०: भारताचे श्रीलंकेला २६१ धावांचे आव्हान, रोहितचे दमदार शतक

इंदोर। भारत विरुद्ध श्रीलंका संघात होळकर क्रिकेट स्टेडिअमवर सुरु असलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर २६१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात रोहित शर्माने शतकी तर के एल राहुलने अर्धशतकी खेळी केली.

भारताने २० षटकात ५ बाद २६० धावा केल्या आहेत. याबरोबरच भारताने आंतरराष्ट्रीय टी २०मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या उभी केले आहे.

श्रीलंका कर्णधार थिसेरा परेराने नेणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी या निर्णयाला पूर्णपणे निष्प्रभ ठरवले. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १६५ धावांची दीडशतकी भागीदारी रचली.

रोहितने आज विक्रमी शतक करताना आंतरराष्ट्रीय टी २० मधील सर्वात जलद शतक करण्याच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रोहितने ३५ चेंडूंतच शतक पूर्ण केले होते. त्याने आज ४३ चेंडूत ११८ धावांची खेळी केली. यात त्याने १२ चौकार आणि १० षटकार मारले.हे रोहितचे आंतरराष्ट्रीय टी २० तील दुसरे शतक आहे.

एका वेळी रोहितचा अक्रमक खेळ चालू असताना त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ देणाऱ्या के एल राहुलनेही अर्धशतक पूर्ण केले. त्याला त्याचे आंतरराष्ट्रीय टी २० मधील दुसरे शतक पूर्ण करण्यासाठी ११ धावांची गरज असताना ८९ धावांवर नुवान प्रदीपने बाद केले. पण याचे अर्धे श्रेय यष्टीरक्षक निरोशन डिकवेल्लाला द्यावे लागेल त्याने राहुलचा उत्कृष्ट झेल पकडला.

आज एम एस धोनीला(२८) तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. या संधीचा फायदा घेत त्यानेही आक्रमक फलंदाजी केली. त्याने राहूलला भक्कम साथ देताना दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची खेळी केली. राहुल बाद झाल्यावर मात्र भारताच्या विकेट्स पडायला सुरुवात झाली पण तोपर्यंत भारतीय संघाने २३० धावांचा टप्पा पार केला होता.

भारताकडून हार्दिक पंड्या(१०), मनीष पांडे(१*) आणि दिनेश कार्तिक(५*) यांनी अखेरच्या २ षटकात येऊन धावा केल्या. तर श्रेयश अय्यर शून्य धावेवर बाद झाला.

श्रीलंकेकडून दुशमंथा चमिरा(४५/१), प्रदीप(२/६१) आणि परेरा(२/४९) यांनी बळी घेतले.