दक्षिण आफ्रिकेसमोर भारताचे २९० धावांचे आव्हान

जोहान्सबर्ग। भारताने चौथ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर ५० षटकात २९० धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शतक केले आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवर रोहित शर्माला मागील काही सामन्यांप्रमाणे या सामन्यातही कागिसो रबाडाने ५ धावांवर असताना बाद केले.

त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने भारताचा डाव सांभाळत भारताला भक्कम स्थितीत पोहचवले. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १५८ धावांची दीडशतकी भागीदारी रचली. मात्र विराट ८३ चेंडूत ७५ धावांवर असताना बाद झाला. त्याने त्याच्या खेळीत ७ चौकार आणि १ षटकार मारला.

शिखर मात्र त्याच्याच चांगल्या लयीत खेळत होता. त्याने शतकी खेळी करताना ११ चौकार आणि २ शतकारांच्या साहाय्याने १०५ चेंडूत १०९ धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने ही शतकी खेळी त्याच्या १०० व्या वनडे सामन्यात केली आहे. वनडे कारकिर्दीतील हे त्याचे १३ वे शतक आहे. 

१०० व्या वनडे सामन्यात शतकी खेळी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील ९ वा फलंदाज ठरला आहे. शिखर बाद झाल्यानंतर एम एस धोनीने आज आक्रमक खेळताना ४३ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या आहेत. मात्र त्याला बाकी फलंदाजांकडून विशेष साथ मिळाली नाही.

बाकी फलंदाजांपैकी अजिंक्य रहाणे(८), श्रेयश अय्यर(१८), हार्दिक पंड्या(९) आणि भुवनेश्वर कुमार(५) यांनी धावा केल्या. भारताने या डावात ५० षटकात ७ बाद २८९ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा (२/५८), लुंगीसानी एन्गिडी(२/५२), ख्रिस मॉरिस (१/६०) आणि मोर्ने मॉर्केल(१/५५) यांनी विकेट्स घेतल्या.