भारतीय क्रिकेट संघाच्या व्हिडिओ ॲनालिस्टची उचलबांगडी

दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी एक दिवस आधी भारतीय क्रिकेट संघाच्या व्हिडिओ ॲनालिस्ट आशिष टुल्लीची उचलबांगडी झाली असून त्याजागी सिकेएम धनंजय यांची निवड झाली आहे.

सिकेएम धनंजय यांनी यापूर्वी भारतीय संघाबरोबर काम केलं असून ते एका खाजगी कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी आयपीएलमधील मुंबई इंडियन्सला विडिओ ॲनालिसीस तसेच तांत्रिक मदत करते.

सिकेएम धनंजय हे भारतीय संघाचे व्हिडिओ ॲनालिस्ट असताना संघाने टी२०चा २००७चा विश्वचषक, २०११चा ५० षटकांचा विश्वचषक आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

व्हिडिओ ॲनालिस्ट हे संघासाठी अतिशय उपयोगी ठरणारे पद आहे. यामुळे खेळाडूंना आपल्या चुका सुधारण्यास तसेच समोरच्या संघाच्या जमेच्या बाजू आणि कच्चे दुवे हेरण्यात मदत होते.

भारतीय संघ २८ डिसेंबर रोजी सकाळी २ महिन्यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असून ५ जानेवारी रोजी पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे.