दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी ३०४ धावांचे लक्ष

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या वनडेत कर्णधार विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने ५० षटकांत दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी ३०४ धावांचे लक्ष ठेवले आहे.

नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने विराट कोहलीच्या टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. परंतु संपूर्ण सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या आफ्रिकेच्या हा निर्णय चांगलाच अंगलट आला.

एका बाजूने नियमित अंतराने विकेट्स जात असतानाही आपल्याला जगातील मर्यादित षटकांतील सर्वोत्तम खेळाडू का म्हणतात हे आज विराटने दाखवून दिले. वनडे कारकिर्दीतील ३४वे शतक करताना विराटने अतिशय संयमी परंतु वेळ आली तेव्हा तेवढीच स्फोटक खेळी केली.

त्याने १५९ चेंडूचा सामना करताना १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद १६० धावांची खेळी केली. त्याला सुरुवातीला सलामीवीर शिखर धवनने ६३ चेंडूत ७६ धावा करत चांगली साथ दिली.

अन्य फलंदाजांमध्ये रोहित शर्मा (०), अजिंक्य रहाणे (११), हार्दिक पंड्या (१४), एमएस धोनी (१०), केदार जाधव (१) आणि भुवनेश्वर कुमार नाबाद १६ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून रबाडा (१/५४), ख्रिस मॉरिस (१/४५), इम्रान ताहीर (१/५२), ड्युमिनी (२/६०) यांनी विकेट्स घेतल्या.