कसोटी क्रमवारीनंतर वनडे क्रमवारीतही विराट सेना अव्वल !

भारतीय संघाने काल दक्षिण आफ्रिकेवर पाचव्या वनडेत ७३ धावांनी विजय मिळवून ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. या विजयाबरोबरच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या विराट कोहलीच्या संघाने आयसीसीने काल जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीतही अव्वल स्थानही पक्के केले आहे.

सध्या भारत १२२ गुणांसह अव्वल स्थानी आहे तर दक्षिण आफ्रिका ११८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे १६ फेब्रुवारीला होणाऱ्या सहाव्या वनडेत कोणताही निकाल लागला तरी भारताच्या अव्वल स्थानावर परिणाम होणार नाही. फक्त गुणांवर परिणाम होईल.

जर भारताने पुढील सामन्यात विजय मिळवला म्हणजेच मालिका ५-१ अशी झाली तर भारताचे १२३ गुण होतील आणि दक्षिण आफ्रिकेचे ११७ गुण होतील. पण जरी भारताला सहाव्या वनडेत पराभवाला सामोरे जावे लागले तर त्यांचे १२१ गुण होऊन दक्षिण आफ्रिकेला एक गुण मिळेल आणि दक्षिण आफ्रिकेचे ११९ गुण होतील.

भारताचे ही मालिका सुरु होण्याआधी ११९ गुण होते आणि दक्षिण आफ्रिका १२१ गुणांसह अव्वलस्थानी विराजमान होती. त्यामुळे भारताला अव्वल स्थान मिळवून ते पक्के करण्यासाठी ६ सामन्यातील ४ सामने जिंकणे आवश्यक होते.

भारताने दुसरा सामना जिंकून अव्वल स्थान आधीच मिळवले होते पण हे स्थान पक्के नव्हते. त्यासाठी त्यांना आणखी दोन विजयाची गरज होती. जे भारताने कालचा सामना जिंकून पूर्ण केली.

आता दक्षिण आफ्रिकेला त्यांचे दुसरे स्थान टिकवण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्या होणाऱ्या ५ सामन्यांच्या वनडे मालिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे. जर इंग्लंडने न्यूझीलंडला ५-० असा व्हाईटवॉश दिला, तर इंग्लंड क्रमवारीत दुसरे स्थान मिळवेल आणि दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या क्रमांकावर घसरावे लागेल.