भारताने विजयासह या वर्षातली शेवटची मालिकाही घातली खिशात

इंदोर। भारत विरुद्ध श्रीलंका संघात होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे पार पडलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ८८ धावांनी विजय मिळवून ३ सामन्यांची ही टी २० मालिकाही खिशात घातली आहे. या सामन्यात रोहित शर्माने शतक साजरे केले तर युजवेंद्र चहलने आजही ४ बळी घेतले.

भारताने दिलेल्या २६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून फक्त पहिल्या ३ फलंदाजांनीच चांगली कामगिरी केली. सलामीला आलेल्या निरोशान डिकवेल्ला(२५) आणि उपुल थरंगा यांनी ३६ धावांची भागीदारी रचली. डिकवेल्ला बाद झाल्यावर थरंगा आणि कुशल परेरा यांनी आक्रमक फलंदाजी करताना दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. परंतु थरंगा ४७ धावांवर बाद झाला.

यानंतर आलेल्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. फक्त कुशल परेराने अर्धशतकी खेळी करून थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही ७७ धावांवर असताना कुलदीप यादवने बाद केले. त्याने ही अर्धशतकी खेळी करताना ४ चौकार आणि ७ षटकार ठोकले.

भारताकडून चहल(४/५२), कुलदीप(३/५२), हार्दिक पंड्या(१/२३) आणि जयदेव उनाडकट(१/२२) यांनी बळी घेत श्रीलंकेला १७.२ षटकातच ९ बाद १७२ धावांवर रोखले. श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज दुखापतीमुळे फलंदाजीला येऊ शकला नाही. त्याला गोलंदाजी करताना पायाची दुखापत झाली त्यामुळे त्याला तो टाकत असलेले षटकही अर्धे सोडून पॅव्हेलियनमध्ये परत जावे लागले होते.त्याचे षटक अकिला धनंजयाने पूर्ण केले होते.

तत्पूर्वी भारताने २० षटकात ५ बाद २६० धावा केल्या होत्या. भारताकडून रोहित शर्मा(११८), के एल राहुल(८९), एम एस धोनी(२८), पंड्या(१०), दिनेश कार्तिक(५*) आणि मनीष पांडे(१*) यांनी धावा केल्या.  रोहितने आज आंतरराष्ट्रीय टी २० मधील सर्वात जलद शतक करण्याच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

रोहित शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. भारताचा पुढील सामना २४ डिसेंबरला मुंबईत खेळवण्यात येणार आहे. हा सामना या वर्षातील भारताचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल.