दुसरी कसोटी: दिवसाखेर श्रीलंका ५० वर २

कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी श्रीलंका संघाची अवस्था २ बाद ५० अशी आहे. दोंन्ही विकेट्स भारताच्या आर अश्विनने घेतल्या.

भारताने आपला पहिला डाव ९ बाद ६२२वर घोषित केला आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या श्रीलंका संघाला दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोठा झटका बसला.श्रीलंकेचा सलामीवीर उपुल तरंगा ० धावा काढून परतला. त्याला अश्विनने केएल राहुल करवी झेलबाद केले. त्यांनतर करुणारत्ने २५ धावा करून तंबूत परतला.

तत्पूर्वी काल खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करणारे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सकाळच्या सत्रात बाद झाले आहेत तर दुपारच्या सत्रात आर अश्विन आणि हार्दिक पंड्या बाद झाले.

भारताला आज दिवसातील पहिला झटका चेतेश्वर पुजाराच्या रूपाने ९२ व्या षटकात बसला. पुजारा कालच्या धावसंख्येचा ५धावांची भर घालून १३३ धावांवर बाद झाला. अजिक्य रहाणेलाही आज काही खास करिष्मा दाखवता आला नाही. त्याने कालच्या धावसंख्येत २९ धावांची भर घालून १३२ धावांवर तो बाद झाला.

आर अश्विनने, वृद्धिमान सहा आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केली. अश्विनने ९२ चेंडूत ५४ धावांवर बाद झाला. यष्टिरक्षक सहाने मात्र एका बाजूने नेटाने किल्ला लढवत १२८ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. त्याला रवींद्र जडेजाने उत्तम साथ दिली. जडेजा ७० धावांवर नाबाद राहिला.