१७ वर्षीय भारतीय खेळाडूने दिले ऐतिहासिक गोलनंतर आनंद साजरा न करण्याचे कारण

भारतीय संघाचा अंडर १७ विश्वचषकातील प्रवास आटोपला आहे. भारतीय संघ गटातील तिन्ही सामने गमावल्याने स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. या तिन्ही सामन्यात मिळून भारतीय संघाने फक्त एक गोल केला. हा गोल भारताने दुसऱ्या सामन्यात कोलंबिया विरुद्ध केला होता.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाला अमेरिकेकडून ३-० आता पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ १-० अश्या पिछाडीवर असताना जॅकसन सिंग याने भारतासाठी गोल करत सामन्यात बरोबरी साधली. हा गोल भारताचा फिफाच्या स्पर्धेतील पहिला गोल होता. त्यामुळे संपूर्ण देश आणि सर्व खेळडू या ऐतिहासिक गोल झाल्यामुळे जल्लोष करत होते पण एक खेळाडू डोक्याला हात लावून बसलेला दिसत होता. त्यामुळे त्या खेळाडूला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते.

हा खेळाडू होता केरळमध्ये जन्मलेला राहुल के. प्रवीण. केरळमधील आणखी तीन खेळाडू समवेत राहुल घरी परतल्यावर त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. त्यानंतर त्याला पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला ,भारतासाठी जॅकसनने गोल केल्यानंतर सर्व खेळाडू आनंद साजरा करत होते आणि तू मात्र डोक्याला हात लावून दिसत होतात असे का? त्यावर राहुलने उत्तर दिले,” मी त्या गोल साजरा करताना दिसलो नाही कारण मी भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होतो.”

फॉरवर्ड पोजिशनवर खेळणारा राहुल भारतीय संघातील सर्वात वैविध्यपूर्ण खेळाडू आहे. तो कोणत्याही जागेवर खेळण्यास सक्षम आहे. राहुल त्या चार खेळाडूंमध्ये आहे जे भारतीय संघाच्या तिन्ही सामन्यात पूर्णवेळ खेळाडू राहिले आहेत. अमेरिका विरुद्धच्या सामन्यात राहुल राइट बॅकच्या भूमिकेत होता तर अन्य दोन सामन्यात तो अटॅकरच्या भूमिकेत होता.

# विश्वचषकानंतर पुढे काय?
राहुल काही मोजक्या खेळाडूंमध्ये आहे ज्यांनी अजून तरी ऑल इंडिया फुटबॉल फेडेरेशन सोबतच्या करारावर स्वाक्षरी केली नाही. सूत्रांच्यानुसार ज्या खेळाडूंनी स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत ते खेळाडू आय- लीग आणि इंडियन सुपर लीगच्या क्लब्सच्या संपर्कात आहेत. त्यांना हे क्लब करारबद्ध करण्यास उत्सुक असून त्यांच्यासाठी मोठी किंमत मोजण्यास तयार आहेत.

भारतासाठी विश्वचषकात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूमधील राहुल हा फुटबॉलच्या सर्व कौशल्यात निपुण आहे. त्याची गती आणि आक्रमक विचार आणि भक्कम बचावला भेदून कौशल्यपूर्ण पासेस देण्याची हातोटी पाहता हा खेळाडू भविष्यात खूप नाव कमवू शकतो.