युवा टीम इंडियाने सहाव्यांदा जिंकले एशिया कपचे विजेतेपद

ढाका। १९ वर्षांखालील भारतीय संघाने आज (७ आॅक्टोबर) १९ वर्षांखालील एशिया कप स्पर्धेचे सहाव्यांदा विजेतेपद जिंकले आहे. हे विजेतेपद त्यांनी अंतिम सामन्यात १९ वर्षांखालील श्रीलंका संघाचा १४४ धावांनी पराभव करत मिळवले आहे.

याआधी १९८९, २००३, २०१२(संयुक्त विजेतेपद), २०१४ आणि २०१६ साली भारताच्या १९ वर्षांखालील संघाने एशिया कप स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. २०१२ ला पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही संघाना संयुक्तरित्या विजेतेपद बहाल करण्यात आले होते.

आजच्या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला ३८.४ षटकात सर्वबाद १६० धावाच करता आल्या. भारताकडून हर्ष त्यागीने ६ विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.

३०५ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी सलामीवीर निपुन धनंजयाची(१२) विकेट लवकर गमावली. त्यानंतर निशान मादुशका आणि पसिंदू सुरीयाबंदराने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण सुरीयाबंदरला ३१ धावांवर त्यागीने त्याला बाद केले.

त्यानंतर मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने आपल्या विकेट्स गमावल्या. श्रीलंकेकडून फक्त मादुशका आणि नावोद पारानाविथानाने चांगली लढत दिली होती. पण त्यांना अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही.

मादुशकाने ६७ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. तर पारानाविथानाने ६१ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांना मात्र दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.

भारताकडून हर्ष त्यागीने ३८ धावांत सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी सिद्धार्थ देसाई(२/३७) आणि मोहित जांग्राने(१/१८) विकेट घेतली.

तत्पुर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला अचूक ठरवत भारताचे सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि अनुज रावतने चांगली सुरुवात करत १२१ धावांची सलामी भागीदारी रचली.

पण ही शतकी भागीदारी मोडण्यात श्रीलंकेच्या दुलीथ वेलॅलेजला यश आले त्याने अनुजला ५७ धावांवर असताना पायचीत बाद केले. त्यानंतर यशस्वीने दुसऱ्या विकेटसाठी देवदुत पदीक्कलबरोबर ५९ धावांची भागीदारी रचली.

पण यशस्वीला ही भागीदारी रंगत असतानाच कलना परेराने पायचीत बाद केले. यशस्वीने ११३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ८७ धावांची खेळी केली. यशस्वी पाठोपाठ काही वेळात देवदुतला कालहारा सेनारत्नेने त्रिफळाचीत केले. त्याने ३१ धावा केल्या.

यानंतर मात्र कर्णधार प्रभसिमरन सिंग आणि आयुष बाडोनी यांनी एकही विकेट न गमावता चौथ्या विकेटसाठी आक्रमक शतकी भागीदारी रचली. या दोघांनीही नाबाद अर्धशतके करताना ११० धावांची नाबाद भागीदारी रचत भारताला ५० षटकात ३ बाद ३०४ धावांचा टप्पा गाठून दिला.

प्रभसिमरनने ३७ चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. तर आयुषने २८ चेंडूत नाबाद ५२ धावा करताना ५ षटकार आणि २ चौकार मारले.

महत्वाच्या बातम्या-

‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलने शतक करत अ दर्जाच्या क्रिकेटला केला गुडबाय

दुसऱ्या कसोटीत विराटने विश्रांती घ्यावी आणि मयंक अगरवालला खेळवावे

परदेश दौऱ्यात पत्नीला सोबत घेऊन जाण्यासाठी खेळाडूंना परवानगी द्यावी, विराट कोहलीची बीसीसीआयला विनंती