१९ वर्षांखालील विश्वचषक २०१८: भारताचा उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलामीचा सामना

१९ वर्षांखालील विश्वचषकाला आज पासून सुरुवात झाली आहे. या विश्वचषकात उद्या भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलामीचा सामना रंगणार आहे.

भारतीय संघ या स्पर्धेत मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळेल. पृथ्वीने मागील काही महिन्यात देशांतर्गत स्पर्धेत मुंबईकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्याच्याबरोबरच शुभम गिल आणि हिमांशू राणा हे दोन फलंदाजही चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. भारतीय संघाची गोलंदाजीची मदार ईशान पोरेल आणि शिवम मावी यांच्यावर असेल.

यावर्षीचा १९ वर्षांखालील विश्वचषक न्यूझीलंड मध्ये सुरु आहे. भारतीय संघ वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडला आहे. तसेच भारतीय संघाने सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १८९ धावांनी पराभूत केले होते.

भारतीय संघाने २०१६ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यावेळीही भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हेच होते. या सामन्यात भारतीय संघ विंडीकडून पराभूत झाला होता. त्यामुळे यावर्षीही पृथ्वी शॉच्या संघाकडून सर्वांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.