जर टीम इंडियाने कसोटी जिंकली तर आयसीसी क्रमवारीत होणार हे मोठे बदल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्या कसोटी मालिका सुरु आहेत. तसेच उद्यापासून(26 डिसेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

असे असले तरी भारतीय संघ त्यांच्या अव्वल स्थानावर कायम राहणार आहे. मात्र भारताच्या गुणांमध्ये फरक पडू शकतो. जर भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-1 असा विजय मिळवला तर भारत त्यांचे अव्वल स्थान आणखी भक्कम करेल.

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे 118 गुण होती. सध्या भारत 116 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.  दुसऱ्या क्रमांकावर असणारा इंग्लंड भारतापेक्षा 8 गुणांनी मागे आहे.

तसेच जर भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले तर त्यांचे 111 गुण होतील. त्यामुळे क्रमवारीत दुसऱ्या आणि पहिल्या स्थानातील गुणांचे अंतर कमी होईल.

त्याचबरोबर जर दक्षिण आफ्रिकेने मायदेशात पाकिस्तानला 3-0 असे पराभूत केल्यास ते इंग्लंडला मागे टाकत 110 गुणांसह दुसऱ्या स्थानावर येतील आणि पाकिस्तान गुण गमावेल पण सातव्याच क्रमांकावर कायम राहिल.

मात्र पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 3-0 असे पराभूत केल्यास दक्षिण आफ्रिकेची 99 गुणांसह थेट सहाव्या क्रमांकावर घसरण होईल आणि पाकिस्तान 100 गुणांसह पाचव्या स्थानावर येईल. सध्या दक्षिण आफ्रिका 106 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 92 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत जर न्यूझीलंडने 2-0 असा विजय मिळवला तर ते इंग्लंडला मागे टाकत 109 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होतील. तसेच श्रीलंका तीन गुण गमावत एका स्थानाची घसरण होऊन 90 गुणांसह सातव्या स्थानावर येईल.

पण जर ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली तर हे दोन्ही संघ त्यांच्या स्थानावर कायम राहतील. फक्त न्यूझीलंडचा एक गुण कमी होईल. तसेच ही मालिका जर श्रीलंकेने जिंकली तर न्यूझीलंड 6 गुण गमावत 99 गुणांसह पाचव्या क्रमांकावर घसरेल तर श्रीलंका 4 गुण मिळवत सहाव्या स्थानावर कायम राहिल.

तसेच जर या मालिकेतील एक सामना अनिर्णित राहिला आणि एक सामना न्यूझीलंडने जिंकला तर न्यूझीलंड 107 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहचेल. सध्या न्यूझीलंड 105 गुणांसह चौथ्या आणि श्रीलंका 93 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

बापरे! कोहली तिसऱ्या कसोटीत १० दिग्गजांचे १० विक्रम मोडणार

जबरदस्त कामगिरी करणारा मुंबईकर खेळाडू टीम इंडियात का नाही?

चाहत्यांचा हल्लाबोल, रिषभ पंतबद्दलचा तो चुकिचा ट्वीट आयसीसीला भोवला