भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलिया पुढे धावांचे २५३ आव्हान !

कोलकाता | येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन २५२ धावा केल्या आहेत. या धावसंख्येत भारताचा कर्णधार विराट कोहलीचा सिंहाचा वाटा आहे. त्याने १०७ चेंडूत ९२ धावा केल्या. विराटचे ऐतिहासिक शतक फक्त ८ धावांनी हुकले.

प्रथम फलंदाजी करताना रहाणे आणि रोहित शर्माने भारताला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला पण रोहित शर्मा ७ धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट आणि अजिंक्य रहाणेने भारताचा डाव सावरला. अजिंक्य रहाणे अर्धशतक करून धावबाद झाला पण कोहलीने आपला चांगला फॉर्म कायम राखत भारताचा धावफलक पुढे नेला.

त्यानंतर फलंदाजीला मनीष पांडे आला. मागील सामन्याप्रमाणेच याही सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली नाही. त्यानंतर पुणेकर केदार जाधव फलंदाजीस आला. केदारने कोहलीला चांगली साथ दिली पण तो २४ धावांवर बाद झाला. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ही या सामन्यात चमकदार कामगिरी करता आली नाही, तो ५ धावा करून बाद झाला. धोनी बाद झाल्यानंतर पंड्या आणि भूवनेश्वरने जबाबदारी पूर्ण कामगिरी करून भारताचा धावफलक सुस्थितीत नेला. शेवटच्या काही षटकात मोठे फटके मारण्याचा मोह उर्वरित भारतीय फलंदाजांना झाला आणि भारतीय संघ २५२ धावांवर सर्वबाद झाला.

ऑस्ट्रेलियाकडून कोल्टर-नाईलने आणि रिचडसोनने चांगली गोलंदाजी करत प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या तर एगार आणि कमिन्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २५३ धावांची गरज आहे.