HWL 2017: भारत-ऑस्ट्रेलिया सामना १-१ असा ड्रॉ

भुवनेश्वर । हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेत आज भारताचा सलामीचा सामना गतवर्षीच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघासोबत १-१ ड्रॉ अवस्थेत संपला. भारतीय संघाने अनेक संधी निर्माण केल्या परंतु संघाला त्याचे सोने करण्यात अपयश आले.

ऑस्ट्रेलिया संघ सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्याच्या प्रकाशझोतात झालेल्या सामन्यात भारतीय संघ दिग्गज ऑस्ट्रेलियापेक्षा अनेक आघाड्यांवर मजबूत वाटत होता.

सामन्याची सुरुवात आक्रमणाने करणाऱ्या भारतीय संघाने सामन्यातील पहिला गोल २०व्या मिनिटाला केला. मनदीप सिंगने स्ट्राइक घेत हा गोल केला परंतु भारताची ही आघाडी खूप काळ टिकली नाही आणि २१व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाकडून जेरेमी हेवर्डने गोल नोंदवला.

आज भारताची दुसरी लढत बलाढ्य इंग्लंड संघाविरुद्ध संध्याकाळी ७वाजून ३० मिनिटांनी आहे.