पर्थ कसोटीसाठी त्या मुंबईकर खेळाडूला वगळणार? असा असेल ११ खेळाडूंचा संघ

पर्थ। शुक्रवारपासून(14 डिसेंबर) भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना वेस्टर्न क्रिकेट असोशियशन स्टेडियम अर्थात वाका, पर्थ येथे खेळवला जाईल. भारताने चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताने अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत चांगली सांघिक कामगिरी करत 31 धावांनी विजय मिळवला. पण तरीही या सामन्यात भारताच्या केएल राहुल आणि मुरली विजय या जोडीला सलामीला भक्कम सुरुवात करुन देण्यात अपयश आले. त्यामुळे भारतासमोर सलामीचा मोठा प्रश्न उभा आहे.

त्यातच 18 वर्षीय युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉला कसोटी मालिकेच्या आधी आॅस्ट्रेलिया एकादश विरुद्ध खेळलेल्या सराव सामन्यात डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली असल्याने तो पर्थ कसोटीलाही मुकणार आहे. त्यामुळे भारतीय संघ सलामीला राहुल आणि विजयचाच विचार करतील.

तसेच मधल्या फळीत कर्णधार चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांना संधी मिळेल. पुजारा आणि रहाणेने अॅडलेड कसोटीत दुसऱ्या डावात अर्धशतकी भागीदारीही रचली होती.

त्याचबरोबर पुजाराने पहिल्या डावात 123 आणि दुसऱ्या डावात 71 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तर रहाणेने दुसऱ्या डावात 70 धावा करत भारताला 300 धावांचा टप्पा पार करुन दिला होता. त्यामुळे पर्थ कसोटीतही या दोघांकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

कर्णधार विराट कोहलीला अॅडलेड कसोटीत फक्त 37 धावा करता आल्या होत्या. पण तो मागील काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याचे संघातील योगदान महत्त्वाचे आहे. तो या संघात त्याच्या चौथ्या क्रमांकावर खेळेल. त्याच्या पाठोपाठ पाचव्या क्रमांकावर रहाणे खेळेल.

रहाणेनंतर रोहित शर्मा की हनुमा विहारीला संधी द्यायची हा भारतासमोर पर्थ कसोटीआधी मोठा प्रश्न आहे. तसेच रोहितला अॅडलेड कसोटीत छाप सोडता आली नव्हती. त्याने पहिल्या डावात 37 आणि दुसऱ्या डावात 1 धाव केली होती. त्यामुळे पर्थ कसोटीत त्याला वगळण्याची शक्यता आहे.

त्याच्या ऐवजी हनुमा विहारीला संधी मिळू शकते. विहारी हा भारतासाठी अष्टपैलू म्हणूनही चांगला पर्याय आहे. त्याने इंग्लंड दौऱ्यात पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतकी खेळी करत त्याच्यातील चमक दाखवली होती. तसेच त्याची आॅफ-स्पिन गोलंदाजीही भारतासाठी फायदेशीर ठरु शकते.

यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतलाच पहिली पसंती मिळेल. पंतला अॅडलेड कसोटीत धावा करण्यात जरी अपयश आले असले तरी त्याने यष्टीरक्षण करताना चांगली कामगिरी केली होती. त्याने या सामन्यात 11 झेल घेत यष्टीमागे एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरीही केली आहे.

गोलंदाजामध्ये भारतीय संघ आर अश्विनला फिरकी गोलंदाज म्हणून स्थान देईल. त्याने अॅडलेड कसोटीत 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने चेतेश्वर पुजाराबरोबर पहिल्या डावात केलेली अर्धशतकी भागीदारी भारतासाठी महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे त्याच्यातील अष्टपैलू क्षमतेचा भारताला फायदा होईल.

वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांना संधी मिळेल. इशांतचा अनुभव पर्थ कसोटीत महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच बुमराह आणि शमीने अॅडलेड कसोटीत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल.

पर्थची खेळपट्टी ही वेगवान आणि उसळणारी असल्याने वेगवान गोलंदाजांना त्याचा फायदा होणार आहे.

असा असेल भारताचा संभाव्य 11 जणांचा संघ: 

केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

महत्त्वाच्या बातम्या:

ज्या विक्रमाला सचिनला २० वर्ष लागले तो विराट ६ वर्षांतच मोडणार

हॅपी बर्थडे युवी… !

गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या खेळाडूचा आयपीएलला बाय बाय