जेमतेम ६ कसोटी खेळलेला खेळाडू म्हणतो, धोनी देशाचा हिरो

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड कसोटीत पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. तसेच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली आहे.

या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतने 11 झेल घेत एका कसोटी सामन्यात यष्टीमागे सर्वाधिक झेल घेण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.

या पराक्रमाविषयी रिषभ पंतने त्याच्या भावना cricket.com.auशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. याचा व्हिडिओ बीसीसीआयने अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे.

विक्रमाविषयी पंत म्हणाला, ‘मी विक्रमाचा विचार केला नव्हता. पण काही झेल घेणे चांगले होते. तसेच एक महत्त्वाचा टप्पा गाठणे चांगले आहे. पण मी याचा जास्त विचार करत नाही.’

तसेच पंतला भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक एमएस धोनीविषयी विचारल्यावर पंत म्हणाला, ‘तो देशाचा हिरो आहे. मी एक व्यक्ती म्हणून आणि क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडून खूप शिकलो आहे.’

‘तो जेव्हाही आसपास असतो तेव्हा मला एक व्यक्ती म्हणून अधिक आत्मविश्वास येतो. मला जर कोणतीही समस्या असेल तर मी त्याच्याशी शेअर करु शकतो आणि लगेचच त्यावर उपायही मिळतो.’

तसेच पंत असेही म्हणाला, ‘यष्टीरक्षक आणि खेळाडू म्हणून त्याने मला दबावाच्या परिस्थितीत स्थिर राहणे शिकवले आहे. जशी या सामन्यात परिस्थिती होती. तूम्ही शांत आणि स्थिर रहायला हवे आणि तूमचे सर्वोत्तम द्यायला हवे.’

त्याचबरोबर पंतला जेव्हा विचारले की आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट आणि धोनी यांच्यातील एक भाग घ्यायला सांगितला तर तू कोणता घेशील, तेव्हा पंत म्हणाला ‘मी धोनीची यष्टीचीत करण्याची कला आणि गिलख्रिस्टची झेल घेण्याची कला घेईल.’

पंतने एका कसोटी सामन्यात यष्टीमागे 11 झेल घेण्याचा जॅक रसेल आणि एबी डेविलियर्स यांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यांच्या पाठोपाठ या यादीत प्रत्येकी 10 झेलांसह बॉब टेलर, अॅडम गिलख्रिस्ट आणि वृद्धिमान साहा हे तीन यष्टीरक्षक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

-अॅडलेड कसोटी विजयामुळे टीम इंडियाच्या बाबतीत घडला हा खास योगायोग

–Video: स्वत:चाच व्हिडिओ पाहून विराट कोहलीला आवरता आले नाही हसू

–ऑस्ट्रेलियाच्या या मोठ्या स्पर्धेत नाणेफेकी ऐवजी या अनोख्या पद्धतीचा होणार अवलंब