रिषभ पंतच्या त्या ३ चुका पहाच, ज्यामुळे कर्णधार कोहली चिडला

मोहाली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी(10 मार्च) चौथा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताला 4 विकेटने पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-2 अशी बरोबरी ऑस्ट्रेलियाने साधली आहे.

या सामन्यासाठी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला आराम देण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या ऐवजी रिषभ पंतला अंतिम 11 जणांच्या भारतीय संघात संधी देण्यात आली. मात्र पंत या सामन्यात प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे. तसेच त्याने या सामन्यात यष्टीरक्षण करताना काही चूकाही केल्या आहेत.

त्याने ऑस्ट्रेलिया संघ भारताने दिलेल्या 359 धावांचा पाठलाग करत असताना 44 व्या षटकात युजवेंद्र चहल गोलंदाजी करत असताना काही मोठ्या चूका केल्या. यामध्ये त्याने या सामन्यात सामनावीर ठरलेल्या ऍश्टन टर्नर आणि ऍलेक्स कॅरे या फलंदाजांना जीवदान दिले.

44 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर टर्नर 38 धावांवर खेळत असताना पंतने पहिली चूक केली. चहलने वाईडला टाकलेला चेंडू टर्नरने खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याला तो फटका मारता आला नाही. पण त्याचवेळी पंतच्या हातूनही चेंडू निसटल्याने टर्नरला यष्टीचीत करण्याची संधी हुकली.

त्यानंतर याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर पंतने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ऍलेक्स कॅरेला यष्टीचीत करण्याचा प्रयत्न करताना धोनी प्रमाणे स्टंपकडे पाठ करुन चेंडू फेकला. मात्र हा चेंडू स्टंपच्या वरुन गेल्याने पंत हा प्रयत्न फोल ठरला आणि कॅरेला जीवदान मिळाले.

यावेळी हा चेंडू कॅरेच्या पॅडला लागून पंतच्या डाव्या बाजूला गेला होता. पण त्यावेळी चेंडू कुठे गेला हे पाहण्याआधीच धाव घेण्यासाठी कॅरे धावला. त्यावेळी चेंडूच्या मागे जात पंतने स्टंपच्या दिशेला पाठ करुन पायांच्या मधून चेंडू फेकला. मात्र हा चेंडू स्टंपला न लागता पुढे गेला ज्यामुळे, कॅरे आणि टर्नरने चोरटी धाव घेतली.

यावर चहल आणि भारतीय कर्णधार विराटनेही नाराजी व्यक्त केली.

तसेच त्यानंतर या षटकातील चौथा चेंडू वाईड असतानाही टर्नरने खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हा फटका हुकल्याने पंतने स्टंपवरील बेल्स उडवल्या. त्यावेळी पंचानी टर्नरला नाबाद दिल्याने पंतने रिव्ह्यू घेण्यास विराटला सांगितले. यावेळी त्याने यष्टीमागे झेलसाठी रिव्ह्यू घेण्यास सांगितले होते.

त्यामुळे रिव्ह्यूमध्ये यष्टीचीत आणि झेल असे दोन्ही गोष्टी तपासण्यात आल्या. यष्टीचीतच्या वेळी टर्नरचा पाय क्रिजच्या आत असल्याने ती संधी गेली पण पंतच्या म्हणण्यानुसार बॅटची कड चेंडूला लागली होती. त्यामुळे झेलही तपासण्यात आला. त्यात अल्ट्राएजमध्ये काही हालचाल जाणवली मात्र टर्नरला नाबाद देण्यात आले.

त्यामुळे विराटही चिडलेला स्पष्ट दिसून आले. तसेच या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांकडून अनेक चूका पहायला मिळाल्या. त्यामुळे विराटने या गोष्टीला पराभवासाठी जबाबदार धरले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पिटर हँड्सकॉम्बने 117, उस्मान ख्वाजाने 91 धावा केल्या. तसेच शेवटच्या काही षटकात तुफानी फलंदाजी करताना टर्नरने 43 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या –

आकाश अंबानीच्या लग्नात हार्दिक पंड्या-करण जोहरने धरला ठेका

एवढी चांगली खेळी केलेल्या त्या खेळाडूचे नावच विसरला शिखर धवन

हत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे मॅच फिक्सिंग- एमएस धोनी