या ५ कारणांमुळे रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत येणार ओपनिंगला

भारताने आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला विजयी सुरुवात केल्यांनतर दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. यामुळे दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.

या दोन्ही सामन्यात भारताकडून फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि तळातल्या फलंदाजांकडून चांगली कामगिरी झाली. मात्र या सामन्यांमध्ये भारताचे सलामीवीर फलंदाज मुरली विजय आणि केएल राहुल यांनी निराशा केली आहे. तर दुसऱ्या सामन्यास रोहित शर्मा पाठीच्या दुखापतीमुळे मुकला होता.

रोहित शर्माला तर जवळ जवळ 10 महिन्यांनतर भारताच्या कसो़टी संघात संधी मिळाली होती. पण त्यालाही त्याचा फायदा घेता आलेला नाही. मात्र त्याला मेलबर्नच्या कसोटीमध्ये सलामीला येण्याची संधी आहे.

मेलबर्नमध्ये 10 सामन्यात 58 सरासरीने केल्या धावा

मेलबर्न येथे तिसरा कसोटी सामना होणार आहे. या मैदानावर जरी रोहितला कसोटीमध्ये खेळण्याचा अनुभव नसला तरी त्याने येथे 10 मर्यादित षटकांच्या सामन्यात 58च्या सरासरीने 409 धावा केल्या आहेत.

या मैदानावर रोहितने सहा वन-डे आणि चार टी20 सामने खेळले आहेत. यामधील चार वन-डे आणि दोन टी20 सामन्यात सलामीला येताना 68.20च्या सरासरीने 314 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने वन-डे मध्ये दोन शतकेही केली आहेत. तर 138 ही त्याची मेलबर्नमधील सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.

यावर्षी रोहितची सरासरी 48 पेक्षा अधिक

रोहितने यावर्षी 41 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 3 कसोटी, 19 वन-डे आणि 19 टी20 सामन्यांचा समावेश आहे. यामध्ये त्याने 48.22च्या सरासरीने 1736 धावा केल्या तर वन-डे मध्ये पाच आणि टी20 मध्ये दोन शतकेही ठोकली आहेत. 162 ही त्याची यावर्षातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.

रोहितने परदेशात यावर्षी 39पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या

यावर्षी रोहितने परदेशता 33 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 3 कसोटी, 14 वन-डे आणि 16 टी20 सामन्यांचा समावेश आहे. यामध्ये त्याने 39.54च्या सरासरीने 1226 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने वन-डे मध्ये तीन आणि टी20 मध्ये एक शतक केले आहे.

केएल राहुलने यावर्षी 30पेक्षीही कमी सरासरीने धावा केल्या

राहुलने यावर्षी 28 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. त्यामध्ये 12 कसोटी, 3 वन-डे, 13 टी20 सामन्यांचा समावेश आहे. या सामन्यात राहुलने 26.90च्या सरासरीने 861 धावा केल्या असून त्यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध राहुलने पहिल्या कसोटीमध्ये 2 आणि 44 तर दुसऱ्या कसोटीमध्ये 2 आणि 0 अशा धावा केल्या आहेत. तसेच 149 ही त्याची यावर्षाची सर्वोत्तम धावासंख्या आहे.

मुरली विजयची यावर्षीची सरासरी 18.80

या कसोटी मालिकेमध्ये विजयने पहिल्या कसोटी सामन्यात 11 आणि 18 अशा धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या कसोटीमध्ये 0 आणि 20 धावा केल्या आहेत. यावर्षी विजयने आठ कसोटी सामने खेळताना 18.80च्या सरासरीने 282 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतकही केले आहे.

पार्थिवपेक्षा रोहितचेच पारडे जड

तिसऱ्या कसोटीसाठी राहुलला जर संघातून वगळले तर पार्थिवला संधी मिळू शकते. पण त्याने यावर्षी फक्त दोनच कसोटी सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकविरुद्धच्या सेंचुरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये त्याने 38 आणि जोहान्सबर्ग येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 18 धावा केल्या आहेत.

पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी मंयक अगरवालला संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे भारताकडे रोहित बरोबरच मंयक अगरवाल, केएल राहुल, मुरली विजय आणि पार्थिव पटेल यांचे सलामीवीर फलंदाज म्हणून पर्याय आहेत. पण पार्थिवला संधी मिळाली तर रिषभ पंतला संघातून बाहेर जावे लागेल.

रोहित हा आक्रमक फलंदाज आहे. तसेच त्याची मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील सलामीला खेळतानाची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्याचा त्याला चांगला अनुभवही आहे. तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही सलामीला फलंदाजी करताना थोडा वेळ घेतो आणि मग आक्रमक फटके खेळायला सुरुवात करतो. त्यामुळे तो कसोटीतही भारताला चांगली सुरुवात करुन देऊ शकतो.

तसेच मधल्या फळीत भारताकडे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे असे फलंदाज असतील.

महत्त्वाच्या बातम्या:

अंपायरच्या त्या निर्णयामुळे कर्णधार चिडला, सामना ८ मिनीटे थांबवला

वनडेत संधी मिळाली नाही तर पुजारा-रहाणे या संघाकडून खेळणार तीन मालिका

Maharashtra Kesari: बुलढाण्याचा बालारफिक शेख महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी