स्टिव्ह स्मिथसाठी कोलकाता वनडे खास

कोलकाता । येथे होणारा दुसरा वनडे सामना ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या वनडे कारकिर्दीतील १००वा वनडे सामना आहे. ५ वनडे सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्याच्या पूर्वसंध्येला स्मिथने आपला सर्व प्रवास उलगडला. एक लेग ब्रेक गोलंदाज ते ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज ह्या प्रवासात आपण खूप प्रगल्भ झालो असल्याचंही स्मिथ म्हणाला.

“एक खेळाडू म्हणून माझ्यात खूप चांगले बदल झाले. मी सफेद चेंडूंवर खेळणारा फलंदाज म्हणून पुढे आहे. माझ्या पहिल्या ३० सामन्यात तर मी गोलंदाज म्हणूनच खेळलो आहे. मला थोडं बदलावं लागलं. मी त्यांनतर तिसऱ्या क्रमांकावर खेळू लागलो. “ स्मिथ म्हणाला.

” एक खेळाडू म्हणून मला सारख्या चौकार मारावे किंवा वेळ पाहून ते मारावे हा विचार करावा लागला. १०० वनडे सामना खेळणे रोमांचक आहे. “

स्मिथला त्याची विश्वचषक २०१७मध्ये भारताविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत केलेले शतक हे वनडे कारकिर्दीतील सर्वात प्रिय खेळी वाटते. “मला सिडनी क्रिकेट मैदानावर २०१५च्या विश्वचषकात केलेली शतकी खेळी ही सर्वात आठवणीतील खेळी वाटते. तो एक मोठा सामना होता. संघाच्या काही विकेट्स लवकर गेल्या होत्या त्यामुळे ते शतक खास आहे.”

स्मिथने ९९ वनडे सामन्यात ४३.६७ च्या सरासरीने ३१८८ धावा केल्या आहेत. त्यात ८ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे.