एएफसी आशियाई करंडक- भारत स्पर्धेबाहेर, बहरिन विरुद्ध थरारक सामन्यात पराभूत

शारजाह स्टेडियमवर झालेल्या थरारक सामन्यात भारताला बहरिन विरुद्ध १-० असा पराभव स्विकारावा लागला. यामुळे भारत स्पर्धेबाहेर झाला तर बहरिन बाद फेरीत पोहचला आहे.

बहरिनकडून जमाल रशीदने अधिक वेळेच्या सुरूवातीला म्हणजे ९१व्या मिनिटाला हा विजयी गोल केला. त्याचबरोबर भारताचे बहरिन विरुद्ध पराभवाचे सत्र सुरूच राहिले आहे. आधी झालेल्या ५ पैकी ४ सामन्यात बहरिनच विजयी ठरला आहे.

४-४-२च्या फॉर्मेशनने या सामन्याला सुरूवात करताना भारताला ४थ्या मिनिटालाच संघात बदल करावा लागला. डिफेंडर अनस एदाथोडिकाला दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. त्याच्या जागी सलाम रंजन सिंग संघात आला.

बहरिनने त्यांचे आक्रमण करताना गोलकिपर गुरप्रीत सिंग संधूने कोमेल अल असवादचा शॉट रोखला. भारताची बचावफळी सुरूवातीला धोक्यात आली होती. मात्र संदेश झिंगनने उत्तम खेळ केला. पहिल्या सत्रात भारताने अनेक संधी गमावल्या. दोन्ही संघाच्या बचावफळीने उत्तम कामगिरी करत अनेक हल्ले रोखले.

दुसऱ्या सत्रास बहरिनने आक्रमक सुरूवात केली. परत एकदा झिंगनने उत्तम कामगिरी करत त्यांना गोल करण्यापासून रोखले. यावेळी बहरिनला फ्री-कीक मिळाली होती. संधूने वेळीच ती रोखत त्यांना आघाडी घेण्यापासून थांबवले.

६५व्या मिनिटाला सुनिल छेत्रीने फ्री-कीकवर गोल करण्याची संधी थोडक्यात घालवली. ७९व्या मिनिटाला भारतीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईनने हलिचरण नारझरयच्या जागी अनिरुद्ध थापाला संघात आणले. छेत्री पाठोपाठ जेजे लापेखलुआनेही गोल करण्याची संधी दवडली.

९१व्या मिनिटाला रशीदने मारलेला शॉट संधूला अडवता आला नाही. त्याने पेनल्टीवर हा गोल करत बहरिनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उरलेल्या वेळात भारताचे सामना बरोबरीत करण्याचे प्रयत्न सुरूच होते. मात्र त्यामध्ये यश न आल्याने भारताला सामना गमवावा लागला त्याचबरोबर स्पर्धेबाहेरही पडावे लागले.

या स्पर्धेला भारताने थायलंडला ४-१ असे पराभूत करत विजयी सुरूवात केली होती. नंतरच्या सामन्यात मात्र अरब अमिराती संघाकडून २-० असे पराभूत व्हावे लागले होते. यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी आजच्या सामन्यात भारताला विजय मिळवणे किंवा बरोबरी साधणे आवश्यक होते.

अरब अमिराती विरुद्ध थायलंड सामना १-१ असा बरोबरीत राहिल्याने भारताने हा सामना बरोबरीत आणला असता तर ते बाद फेरीत पोहचले असते.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रॅक्टिसमध्ये खेळलेले लाखो बाॅल आले कामाला, थेट झाला टीम इंडियाचा सदस्य

माजी रणजीपटूचा मैदानावरच क्रिकेट खेळताना मृत्यु

२०१८मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एबी खेळणार २०१९मध्ये या संघाकडून