भारत विरुद्ध इंग्लंड: बहुचर्चित पहिल्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही…

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत पाच सामने होणार असून पहिला सामना आज एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.

भारतीय संघ या मालिकेची सुरुवात कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा संघ म्हणून करेल, तर इंग्लंडसाठी हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. इंग्लंडचा हा 1000 वा कसोटी सामना असणार आहे.

मात्र भारतीय संघाचा इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटचा विशेषत: एजबॅस्टन मैदानावरील विक्रम खास नाही. त्यामुळे भारत हा इतिहास पुसण्याच्या इराद्याने ही मालिका खेळेल.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत 57 कसोटी सामने झाले असुन भारताला यात फक्त 6 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर इंग्लंडने 30 सामने जिंकले आहेत आणि 21 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.

त्याचबरोबर भारताला इंग्लंडमध्ये 1971,1986 आणि 2007 असे फक्त तीन वेळाच कसोटी मालिका जिंकता आल्या आहेत.

तसेच भारताने इंग्लंड विरुद्ध एजबॅस्टन मैदानावर 6 कसोटी सामने खेळले असून त्यातील 5 सामन्यात पराभव पत्करला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. याबरोबरच इंग्लंडने याच मैदानावर भारताविरुद्ध 2011 मध्ये सर्वात मोठा विजय मिळवला होता. त्यांनी त्यावेळी भारताला एक डाव आणि 242 धावांनी पराभूत केले होते.

विशेष म्हणजे भारताने एजबॅस्टन मैदानावर शेवटचा कसोटी सामना 2011 मध्ये खेळला होता. त्यावेळी भारत कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता. त्यानंतर सात वर्षांनंतर भारत या मैदानावर कसोटी सामना खेळणार आहे आणि यावेळीही भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.

भारतीय संघात या सामन्यासाठी भुवनेश्वर कुमार आणि जयप्रीत बुमराह हे दुखापतीमुळे अनुपस्तीत असल्याने वेगवान गोलंदाजीची जबाबदारी इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर असेल.

तसेच फिरकी गोलंदाजांमध्ये आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि कुलदिप यादव असे भारताकडे पर्याय आहेत. पण सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने  कुलदिप यादवला 11 जणांच्या संघात संधी मिळेल यांचे संकेत दिले आहेत.

त्याचबरोबर भारताच्या फलंदाजीची भिस्त ही कर्णधार विराट कोहली, मुरली विजय, रहाणे, शिखर धवन, केएल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्यावर असेल. त्याचबरोबर दिनेश कार्तिक की रिषभ पंत यांच्यातील कोणाला संधी मिळते हे पहावे लागेल.

इंग्लंड संघाच्या फलंदाजीची जबाबदारी ही अॅलिस्टर कूक, जो रुट, जॉस बटलर, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो अशा खेळाडूंवर अवलंबून असेल तर गोलंदाजीत जेम्स अँडरसन हा अनुभवी गोलंदाज संघात आहे. तसेच त्याच्या जोडीला स्टुअर्ट ब्रॉड, मोइन अली, अदिल रशीद असे गोलंदाज आहेत. याबरोबरच बेन स्टोक्स हा अष्टपैलू खेळाडूही आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत कधी होणार आहे पहिला कसोटी सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना 1 आॅगस्ट 2018 ला होणार आहे.

कोठे होईल इंग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.

किती वाजता सुरु होईल इंग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना?

भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

सोनी टेन 3,सोनी टेन 3 एचडी, सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना इंग्लंड विरुद्ध भारत  पहिला कसोटी सामना पाहता येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

sonyliv.com या वेबसाईटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना ऑनलाइन पाहता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:

भारत: विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह , इशांत शर्मा, मोहम्मद शमी.

इंग्लंड: जो रूट (कर्णधार), ऍलिस्टर कूक, केटन जेनिंग्स, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, मोइन अली, जॉस बटलर, आदिल रशीद, सॅम करन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, जेम्स पोर्टर.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ५- इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत होणार हे ५ खास विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावा करणारा खेळाडूच झालाय मुलाचा कोच

संपुर्ण वेळापत्रक- टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक घोषीत