चौथी कसोटी: इंग्लंडचे तळातले फलंदाज ठरले टीम इंडियासाठी डोकेदुखी

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 8 बाद 260 धावा केल्या आहेत.

तसेच 233 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून तिसऱ्या दिवसाखेर सॅम करन नाबाद 37 धावांवर खेळत आहे.

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरने दुसऱ्या डावात अर्धशतक करुन इंग्लंडच्या डावाला सावरत इंग्लंडला भक्कम आघाडी मिळवून दिली आहे.

इंग्लंडने तिसऱ्या दिवशी बिनबाद 6 धावांपासून खेळायला सुरुवात केली. परंतू सुरुवातीच्या आर्ध्यातासातच अॅलिस्टर कूकला 12 धावांवर असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बाद केले.

त्यानंतर काही वेळातच तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला मोईन आलीनेही 9 धावा करत विकेट गमावली. कूक आणि अली या दोघांचेही झेल केएल राहुलने घेतले.

यानंतर मात्र इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि सलामीवीर फलंदाज केटन जेनिंग्जने इंग्लंडचा डाव सावरायला सुरुवात केली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागिदारी रचली. ही जोडी तोडण्यात मोहम्मद शमीला यश आले.

त्याने या डावाच्या 32 व्या षटकात जेनिंग्जला 36 धावांवर असताना पायचीत बाद केले. तसेच त्याच्या पुढच्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोला शून्य धावेवर बाद केले. तर काही वेळात त्याने रुटलाही धावबाद करत इंग्लंडला 122 धावांवरच पाचवा धक्का दिला.

इंग्लंड संघर्ष करत असतानाच बेन स्टोक्स आणि जॉस बटलरने 6 व्या विकेटसाठी 56 धावांची भागिदारी केली. आर अश्विनने स्टोक्सला 30 धावांवर असताना अजिंक्य रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले आणि ही जोडी फोडली.

पण तरीही पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही अष्टपैलू खेळाडू सॅम करन भारतासाठी डोकेदुखी ठरला. त्याने बटलरला चांगली साथ देताना त्याच्याबरोबर 8 व्या विकेटसाठी 55 धावांची भागिदारी रचली. त्यानंतर इशांत शर्माने बटलरला पायचीत बाद करत ही जोडी तोडली.

बटलरने या डावात 122 चेंडूत 69 धावांची खेळी केली. यात त्याने 7 चौकार मारले. बटलर बाद झाल्यानंतर रशीद खानने करनची साथ द्यायचा प्रयत्न केला पण तो 11 धावांवर असताना शमीने त्याला यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले.

रशीद खान बाद झाल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

भारताकडून या डावात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 53 धावात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर इशांत शर्माने 36 धावात 2 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियात निवड झालेल्या 20 वर्षीय क्रिकेटपटूने मानले राहुल द्रविडचे आभार

एशियन गेम्स: पाकिस्तानला हरवत भारतीय पुरूष हॉकी संघाने पटकावले कांस्यपदक

एशियन गेम्स: बॉक्सिंगमध्ये अमित पांघलला सुवर्णपदक